Sun, May 19, 2019 22:08होमपेज › Kolhapur › कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन वाटचाल करा

कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन वाटचाल करा

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मिरा बोरवणकर, सुधा मूर्ती यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन वाटचाल करा, असा मौलिक सल्ला अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी विद्यार्थिनींना दिला. दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मार्गदर्शनपर चर्चासत्र आणि ‘ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण’ प्रशस्तिपत्र वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. 

कळंबा गर्ल्स हायस्कूल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांच्या हस्ते 160 विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी दिशा पाटील, संस्थेच्या अध्यक्षा एल. एस. सावंत, सचिव बी. डी. सावंत, मुख्याध्यापिका एस. ए. जाधव, कोल्हापूर कुराश असोसिएशनचे शरद पोवार उपस्थित होते. यावेळी दिवाणी न्यायाधीशपदी अश्‍विनी लगारे यांची निवड झाल्याबद्दल डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी अ‍ॅड. ठोंबरे यांनी महिलांना येणार्‍या अडचणींचा सामना कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्व-अनुभव देखील विद्यार्थिनींनी सांगितले. भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्‍कांची माहिती दिली. आयुष्यात येणार्‍या अडचणीतून मार्ग शोधून त्यावर मात करा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यानंतर प्रश्‍नोत्तराद्वारे विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी जागतिक घडामोडी, सामान्यज्ञान, नागरिकशास्त्र, राज्यघटना आदी विषयांची ओघवत्या शैलीत माहिती दिली. 

‘व्यक्‍तिमत्त्व विकास’ या विषयावर बोलताना पाटील म्हणाल्या, आई-वडील, शिक्षक यांच्याशी प्रामाणिक राहून वाटचाल केल्यास यश नक्‍कीच मिळेल. आई-वडील आणि गुरुजी हेच तुमचे खरे आयडॉल आहेत. आत्मविश्‍वासाने जगायचे असेल तर प्रामाणिक आणि मन शुद्ध हवे. वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि आत्मविश्‍वास देखील वाढतो. आई-वडिलांशी प्रमाणिक वागा,  त्यांच्याशी खोटे बोलू नका. परीक्षा काळात अभ्यासावर भर द्या. मोबाईल, इंटरनेट यापासून दूर राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

न्यायाधीश लगारे म्हणाल्या, शिस्तीला महत्त्व द्या. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेऊन काम करा. अपयश आले म्हणून खचू नका. प्रयत्न करीत राहा. प्रयोग फाऊंडेशनचे समन्वयक विक्रम रेपे यांनी उपक्रमाचा उद्देश सांगितला. मुख्याध्यापिका जाधव यांनी आभार मानले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Guidance, how to deal, the problems, faced by women