Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Kolhapur › अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढील करिअरसाठीच्या शैक्षणिक वाटांच्या शोधमोहिमेत विद्यार्थी-पालक गुंतले आहेत. बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे. अशा विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेसंदर्भात इत्यंभूत माहिती मिळावी, त्यांच्या वेळ श्रम पैशाची बचत व्हावी, या उद्देशाने  दैनिक ‘पुढारी’ आणि कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (केआयटी) यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवारी, 2 जून रोजी अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासबाग मैदान येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी 4 वाजता हे व्याख्यान होणार आहे.

बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षेनंतर विद्यार्थी व पालकांची पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. बारावीनंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकीला पसंती देतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यावर्षीही फ्लोट, फ्रीज आणि स्लाईड अशा तीन टप्प्यांमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत  केआयटीतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या मार्गदर्शन शिबिरात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऑप्शन फॉर्म कसा भरावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीबाबत संभ्रमावस्थेत असणार्‍या विद्यार्थी व पालकांना त्याविषयी माहिती दिली जाणार आहे. विविध टप्प्यांत होणार्‍या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कॉलेज निवडीचे असलेले पर्याय आणि त्या पर्यायांची निवड कशी करावी, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बर्‍याच वेळेला अभियांत्रिकीचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून अतिशय छोट्या चुका होतात, या चुकांमुळे त्यांच्या चांगल्या संधी हुकतात, अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची माहिती दिली जाणार आहे. तसेच राज्य शासनातर्फे देण्यात येणार्‍या शैक्षणिक सवलती व स्कॉलरशिपबद्दलही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले  आहे. या शिबिरासाठी केआयटीचे चेअरमन सचिन मेनन, व्हाईस चेअरमन भरत पाटील, सचिव साजिद हुदली, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्‍नी यांचे सहकार्य लाभले आहे.