Mon, Jan 21, 2019 09:31



होमपेज › Kolhapur › सत्ताधार्‍यांशिवाय पालकमंत्र्यांची बैठक

सत्ताधार्‍यांशिवाय पालकमंत्र्यांची बैठक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी चक्‍क महापालिकेत येऊन आढावा बैठक घेतली. इतिहासात दस्तुरखुद्द पालकमंत्री पहिल्यांदाच महापालिकेत येऊनही स्वागताला कुणीच नसल्याने पालकमंत्री पाटील हेही अवाक् झाले. कुणालाच बैठकीचे निमंत्रण नसल्याने महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरविली. 

दरम्यान, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाकडून पदाधिकार्‍यांना शनिवारी दुपारी बाराला फोनवरून कळविण्यात आले होते. यापुढे असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊ, असे स्पष्टीकरण पत्रकारांना दिले. 

थेट पाईपलाईन योजनेसह अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरात होणार्‍या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी 21 नोव्हेंबरला आयुक्‍त चौधरी यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी चारला बैठक आयोजित केली होती; परंतु महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांना बैठकीची माहिती देण्यात आली नाही. परिणामी पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेत आल्या क्षणी महापौर, उपमहापौर कुठे आहेत़? अशी विचारणा केली. त्यावेळी आयुक्‍तांनी निरोप दिला आहे, असे सांगितले. मात्र बैठक संपली तरी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह इतर पदाधिकारी व नगरसेवक बैठकीकडेे फिरकले नाहीत. उपमहापौर अर्जुन माने यांनीही दुपारी दीडला नगरसचिव कारंडे यांचा फोन आल्याचे सांगितले.