Fri, Mar 22, 2019 06:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › पालकमंत्री-सतेज पाटील यांच्यात पॅचअप?

पालकमंत्री-सतेज पाटील यांच्यात पॅचअप?

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 1:07AMकोल्हापूर : शिवराज भोसले

महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यात पॅचअप झाल्याची चर्चा आहे.  गेल्याच महिन्यात पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या जागांवरील आरक्षण उठवण्याच्या 10-15 वर्षांतील प्रकरणांची पाळेमुळे खणून काढण्याची गर्जना केली होती. त्यानंतर आ. पाटील यांच्याकडून पालकमंत्री पाटील यांच्यावर जाहीर टीका टाळण्यात आल्याचे चित्र असून पालकमंत्र्यांनीही आ. पाटील यांना टार्गेट करण्याचे थांबवल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेतील काठावर असलेली सत्ता टिकवण्यासाठी महापौर निवडणुकीत भाजपने दोन पावले मागे घेतल्याचे बोलले जात आहे.  

राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एकसंध वाटचाल सुरू केली आहे. महिन्याभरापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी आ. मुश्रीफ आणि आ. पाटील सोडत नव्हते. तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची की उचगाव ग्रामपंचायतीची या वादात कलगी तुरा सुरू झाला. पालकमंत्र्यांवर सेटलमेंटचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर उद्विग्‍न झालेल्या पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा राग बाहेर काढला. 

हत्ती जागा झालाय... मुंगीलाही राग येतो, अशा शब्दात पालकमंत्री बरसले होते. महापालिकेच्या जागांवरील आरक्षणांबाबतची गेल्या 10-15 वर्षांतील सर्व माहिती मी आयुक्‍तांकडून मागवणार असून त्याची चौकशी लावणार असल्याची भीमगर्जनाही पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केली होती. शेतकरी संघ, देवस्थानच्या जमिनीवर हॉटेल, इमारती बांधणार्‍यांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते. भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणार्‍या नेत्याकडे इतके साम्राज्य आले कुठून असा सवाल करतानाच आपल्याकडे छोटेसे घर वगळता काहीही नाही असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले होते. आ. पाटील यांच्यावतीने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी चिल्ल्यापिल्ल्यांना का पुढे करता, असा सवाल केला होता. 

आ. मुश्रीफ यांनीही पालकमंत्री दोन नंबरचे असल्याचे सांगत आपण सगळे मिळून जिल्ह्यासाठी भरीव निधी आणूया, असे आवाहन केले. तर आ. सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांनी शहर विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधी आणल्यास हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केले होते. दुसर्‍याच दिवशी पत्रक काढून मी तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणलाय, आता सहा हत्तींवरून माझी मिरवणूक काढा, असा टोला आ. पाटील यांना हाणला होता. आजरा नगरपंचायत निवडणुकीतही पालकमंत्री आणि आमदारद्वयीत चांगलाच कलगी-तुरा रंगला; मात्र महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सगळे काही शांत असल्याचे चित्र आहे.

काहीही करा पण महापालिकेत सत्ता आणा, असा आदेश पालकमंत्र्यांनी सहा महिन्यांपूर्वीच दिला आहे. मात्र आता महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली तरी पालकमंत्री शांत आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटातही शांतताच आहे. पडद्याआडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीकडून सगळी सूत्रे हलवण्यात आली. मात्र बहुमतासाठी आवश्यक गणित जमत नसल्याने भाजपने ताराराणी आघाडीसाठी महापौरपद सोडले आणि तिथेच पालकमंत्री पाटील आणि आ. पाटील यांच्यात पॅचअप झाल्याची चर्चा सुरू झाली. ताराराणी आघाडी अर्थात महाडिक गट ही निवडणूक मात्र फारशा गांभीर्याने लढणार नाही. कारण जिल्हा परिषदेतील सत्ता हातची जाण्याचा धोका आहे. 

जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी...

जिल्हा परिषदेत सध्या काठावरची का असेना भाजपची सत्ता आहे. अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपला तरी पदाधिकारी बदलाची चर्चा पुढे गेलेली नाही. खा. राजू शेट्टी आणि माजी आमदार प्रकाश आवाडे गट सध्या जि. प. मध्ये भाजपसोबत आहे. पण खा. राजू शेट्टी यांनी राज्य पातळीवर भाजपची संगत सोडली असून काँग्रेससोबत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे. आवडेंचीही काँग्रेस नेतृत्वावरील नाराजी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे आता पदाधिकारी बदलायचे ठरले तर खा. शेट्टी आणि प्रकाश आवाडे काय भूमिका घेतात यावरच सगळे चित्र अवलंबून आहे. 
जिल्हा परिषदेतील सत्तेत काँग्रेसने खोडा घालायचा नाही आणि आम्हीही महापौर निवडणुकीत घोडेबाजार करणार नाही, अशा स्वरुपात हे पॅचअप झाल्याचे समजते. त्यामुळेच पालकमंत्री पाटील आणि आ. पाटील यांनी सध्या एकमेकांविरोधात जाहीरपणे टीका करण्याचे टाळले असून सुरूवातीला प्रचंड चुरशीची आणि घोडेबाजाराला वाव देणारी महापौरपदाची निवडणूक आता फक्‍त औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे.