Tue, Jul 23, 2019 19:27होमपेज › Kolhapur › नदीवर कोणा एका गावाने हक्‍क सांगू नये 

नदीवर कोणा एका गावाने हक्‍क सांगू नये 

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:41AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : वार्ताहर

वारणेचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी इचलकरंजीवासीयांची आग्रही भूमिका आणि वारणाकाठच्या ग्रामस्थांची विरोधाची भूमिका कायम असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात वारणा नळपाणी योजनेच्या अनुषंगाने आयोजित बैठक निष्फळ ठरली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी वारणा नळ पाणीपुरवठा योजनेबाबत इचलकरंजी आणि वारणाकाठ अशा दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने समन्वयाने व सन्मानाने प्रशासन योग्य निर्णय घेईल, अशी भूमिका जाहीर केली. 

इचलकरंजी शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत 68.68 कोटींची वारणा नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या कामासाठीची वर्कऑर्डरही पालिकेकडून मक्‍तेदारास देण्यात आली आहे. मात्र, याला दानोळीसह नदीकाठच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याप्रश्‍नी मार्ग काढण्यासाठी  आज पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, इचलकरंजीकरांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. यावर एखाद्या गावाने हक्‍क सांगू नये, सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुरेसा उपसा वारणा उद्भवातून होत नाही. त्यामुळे पाणी शिल्लकच राहते. इचलकरंजी पालिकेसाठी 1 टीएमसी पाणी दिले, तर त्याचा परिणाम भविष्यात वारणाकाठच्या कोणत्याही गावावर होणार नाही किंवा पाणीटंचाईही निर्माण होणार नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सामोपचाराने व सकारात्मकतेने मार्गी लागावा. 

आ. उल्हास पाटील म्हणाले, इचलकरंजीवासीयांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहरासाठी आवश्यक पाण्याची अचूक आकडेवारी अधिकार्‍यांनी घ्यावी, शहराने प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर केल्यास त्यांचीही पाण्याची गरज कमी होईल. पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.

प्रकाश आवाडे म्हणाले, वारणा नळपाणी योजना आवश्यक आहे. केवळ विरोधाला विरोध नको. चांदोली धरणातून शहरासाठी पाणीपुरवठा केल्यानंतरही पाण्याचा मोठा साठा सिंचन व पिण्याकरिता शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ही योजना मार्गी लागण्यासाठी सहकार्य करावे.

जिल्हा एरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वारणा योजनेसाठी काळम्मावाडी प्रकल्पातून दूधगंगा डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मत मांडले. तर कृती समिती सचिव मानाजीराव भोसले यांनी इचलकरंजीला पाणी दिल्यास त्याचा परिणाम सिंचनावर होईल, अशी भीती व्यक्‍त केली. यावेळी कुंभोजचे माजी सरपंच प्रकाश पाटील, दानोळीचे उदय भोगले आदींनी मनोगत व्यक्‍त केले. बैठकीस आ. सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने, उपनगराध्यक्षा सौ. सरिता आवळे, अशोक जांभळे, नितीन जांभळे, शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, सागर चाळके, तानाजी पोवार, अजित जाधव आदी उपस्थित होते.