Wed, May 22, 2019 20:42होमपेज › Kolhapur › गुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट नको : पालकमंत्री पाटील

गुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट नको : पालकमंत्री पाटील

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 12:40AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेल्या गुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि शांतता राखावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दोन समाजातील तेढ भविष्यात जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आपण गुरुवारी (दि. 4) सकाळी कोल्हापुरात येत असून बुधवारच्या घटनेतील जखमींची विचारपूस करण्याबरोबरच ज्या भागात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, त्याची पाहणी करून शांततेसाठी सर्व संबंधितांची बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

ना. पाटील म्हणाले की, दोन समाजात तणाव निर्माण न होता शांततेने प्रत्येक कोल्हापूरकराने व्यवहार करावेत. सर्व समाजांनी एकत्र नांदण्याची शिकवण राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिली आहे. त्यासाठीच त्यांनी प्रत्येक समाजाला न्याय देऊन सर्वधर्म समभावाचे वातावरण निर्माण केले. त्याचे पालन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. कुठल्यातरी राजकीय नेत्याने स्वार्थापोटी आवाहन करायचे आणि दोन समाजांनी एकमेकांच्या उरावर बसायचे, हे राजर्षी शाहू महाराजांच्या आत्म्याला दुःख देणारे आहे. याबरोबरच भविष्याचा विचार करता दोन समाजातील तेढ जिल्ह्याच्या विकासावर दीर्घकालीन विपरीत परिणाम करणारे ठरू शकते. म्हणून प्रत्येक कोल्हापूरकरांना राजर्षी शाहू महाराजांची शपथ आहे की, त्यांनी कोणत्याही अफवांवर अथवा चिथावणीला बळी न पडता शांतता राखावी.

बुधवारी जे मोर्चा आणि प्रतिमोर्चा असे प्रकार घडले, तेही दुर्दैवी आहेत. या प्रकारांमुळेच सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते; पण कोल्हापुरात ते शक्य नाही. कोल्हापूरकर राजर्षी शाहूंचा वारसा जपणारे आहेत. धर्म आणि जातीच्या भिंती झुगारून माणुसकी जपणारी आपली संस्कृती व परंपरा आहे. त्याला तडा जाणार नाही, याची काळजी आणि दक्षता प्रत्येकानेच घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असे ना. पाटील यांनी म्हटले आहे.