Mon, Jun 24, 2019 17:46होमपेज › Kolhapur › तलावाची संरक्षक भिंत कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

तलावाची संरक्षक भिंत कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 12:53AMपन्हाळा : प्रतिनिधी

कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथे शेततळ्याची संरक्षक भिंत कोसळून श्रीपती ज्ञानू चौगले (वय 50) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली.

श्रीपती चौगले हे सकाळी पत्नी उषा यांच्याच्याबरोबर गवत आणण्यासाठी गेले होते. दोघांनी मिळून वैरणीचे दोन भारे घरी आणले. शेतात आणखी एक शिल्लक राहिलेला गवताचा भारा आणण्यासाठी श्रीपती हे परत गेले होते. त्यावेळी शेततळ्या जवळून जात असताना तळ्याची संरक्षक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.

बराचवेळ झाला तरी श्रीपती हे घरी न आल्याने पत्नी उषा या शोधत गेल्या असता तळ्याची संरक्षक भिंत कोसळल्याचे  त्यांच्या द‍ृष्टीस पडली.त्यांनी ही माहिती गावकर्‍यांना सांगताच पडलेली भिंत बघण्यासाठी गर्दी झाली. त्यावेळी काही लोकांना श्रीपती यांचा हात बाहेर द‍ृष्टीस पडला. त्यांना ढिगार्‍याखालून बाहेर काढले असता ते मृत झाले होते. पोलिस पाटील संदीप पाटील यांनी घटनेची वर्दी पोलिसांत दिली. पन्हाळा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविला होता.