Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Kolhapur › ऊसतोड मजुरांचा धंदा तेजीत!

ऊसतोड मजुरांचा धंदा तेजीत!

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:46PMकागल : बा. ल. वंदूरकर

दुष्काळी भागातून पुरेसे ऊसतोडणी मजूर आले नाहीत. पाऊस झाल्यामुळे उसाचे उत्पन्न वाढले. तरुण पिढीने ऊसतोडणीकडे पाठ फिरविली, अशा अनेक कारणांनी यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला असून, ऊसतोडणी मजुरांनी कारखान्यांकडून घेतलेले अ‍ॅडव्हान्स आताच फिटले आहे. त्यामुळे मजुरांना शिल्लक रक्कम घेऊन गावी परतण्याचे वेध लागून राहिले आहेत.  

यंदा 11 नोव्हेंबरला हंगाम सुरू झाला असून, मार्चअखेरपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तोडणी-वाहतूक यंत्रणा कमी आली. पाऊस चांगला झाल्यानेे उसाचे पीक चांगले आले.

उसाच्या उत्पन्नात वाढ झाली. मराठवाडा, विदर्भ या भागातील साखर कारखाने अद्यापही सुरूच आहेत. यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार मिळाला आदी कारणांमुळे चार महिन्यांचा असणारा उसाचा गळीत हंगाम सध्या पाच महिन्यांपर्यंत लांबला आहे. जास्त दिवस काम मिळाल्यामुळे ऊसतोडणी मजुरांनी कारखान्यांकडून घेतलेला अ‍ॅडव्हान्स सध्या फिटला आहे. घरी परत जाताना शिल्लक रक्कम घेऊन जाणार आहेत. जादा दिवसांचा रोजगार मिळाला आहे. मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसतोडणी मजुरांनी सर्वसाधारण बैलगाडी दीड लाख रुपये ते दोन लाख रुपये, तर ट्रॅक्टरसाठी तीन ते चार लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेतलेला आहे.

ऊसतोडणीचा दर 270 रुपये कमिशनसह आणि वाहतूक चांगली असल्यामुळे तोडणी मजुरांना योग्य भाव मिळाला. मात्र, भविष्यात बैलगाड्याच मिळणार नाहीत. सध्या बैलगाड्या कमी करून मजुरांचा आणि कंत्राटदारांचा ट्रॅक्टर घेण्याकडे कल निर्माण होऊ लागला आहे. बैलगाड्यांपेक्षा टॅ्रक्टरमधून जादा उसाची वाहतूक होत असल्यामुळे टॅ्रक्टरना मागणी वाढत आहे. तसेच ऊसतोडणी मजुरांकडून दरवर्षी घेण्यात येत असलेला अ‍ॅडव्हान्स बुडविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेकडो स्थानिक व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. आता त्यामधूनच धडा घेऊन ऊसतोडणी यंत्र घेण्याकडे अनेकांचा कल निर्माण होऊ लागला आहे. या यंत्राकरिता साखर कारखाने आणि राज्य शासनाकडून सबसिडी दिली जात आहे.

साखर कारखान्यांतून उत्पादित होणारे साखर, मळी, इथेनॉल, मोलॅसिस, वीज, अल्कोहल, बगॅसचे दर स्थिर नसल्यामुळे साखर कारखानदारीच अडचणीत आली आहे. याबाबत शासनानेच धोरणामक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात सध्या 180 साखर कारखान्यांनी गाळप घेतले आहे. यामध्ये 99 सहकारी आणि 81 खासगी साखर कारखाने सुरू आहेत.

शेतकर्‍यांच्याच खिशावर डल्ला!

शेतकरी वर्ष-दीड वर्ष काबाडकष्ट करून ऊस पिकवतात. त्यानंतर वेळेत ऊस गाळपाला जावा म्हणून साखर कारखान्यांच्या ऑफिसच्या पायर्‍या झिजवतात. शेकडोवेळा मिनतवार्‍या करून ऊसतोड मिळालीच, तर शेतात पाय ठेवण्याअगोदर ऊसतोड मजूर ‘खुशाली’च्या नावाखाली शेतकर्‍याच्या फाटक्या खिशावर डल्ला मारतात. शेतकर्‍याने ‘खुशाली’ देण्यास जर नकार दिला, तर एक-दोन पेर तशीच ठेवून ऊसतोड केली जाते. उसाची भरणीही व्यवस्थित केली जात नाही. जेणेकरून शेतकर्‍याला आर्थिक नुकसान आणि मनस्तापाला सामारे जावे लागेत. बेकायदा असूनही शेतकर्‍यांकडून ऊसतोड मजूर ‘खुशाली’ वसूल करतात. त्यांच्यावर साखर कारखानेही पायबंद घालू शकलेले नाहीत.