Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Kolhapur › ग्रामीण तरुणांचा कुक्कुटपालनाकडे कल

ग्रामीण तरुणांचा कुक्कुटपालनाकडे कल

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 11:11PMकौलव : प्रतिनिधी

ग्रामीण भागात वाढत्या लोकसंख्येबरोबर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमालीची वाढली आहे. बेरोजगारीवर उपाय म्हणून तरुणवर्ग कुक्कुटपालन उद्योगाकडे वळू लागला आहे. गावोगावी कुक्कुटपालनाची शेड दिसू लागली आहेत. 

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात गावोगावी सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे तांडे तयार झाले आहेत. अनेकांनी कागल, गोकुळ शिरगाव, शिरोली औद्योगिक वसाहतींसह कोल्हापूर, पुणे, मुंबई या शहरांचा नोकरीसाठी रस्ता धरला आहे. अनेकांनी दोन - चार गायी अथवा म्हशी पाळून दुग्धव्यवसायाचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन वर्षांत मांसल कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाने चांगलेच बाळसे धरले आहे. पूर्वीप्रमाणे अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालन हा हेतू बाजूला पडला आहे. मांसासाठी कुक्कुटपालन (ब्रॉयलर)ची संकल्पना गावोगावी रूजली आहे. त्यासाठी संबंधित कंपन्याच सर्व सोपस्कार करत असल्याने तरुणांचा कल ब्रॉयलर कोंबड्यांकडे वाढला आहे. 

अगदी दोन हजारपासून दहा हजारपर्यंत कोंबड्यांच्या क्षमता असलेली कुक्कुटपालन शेडस् उभारली आहेत. या शेडच्या उभारणीसाठी बँकांतून कर्ज योजनाही उपलब्ध आहेत. आठ दिवसाची पिल्ले आणून सोडल्यानंतर अठ्ठेचाळीस दिवसांनी विक्रीसाठी पाठवली जातात. अगदी पिलांच्या पुरवठ्यापासून विक्रीपर्यंतची व्यवस्था तसेच त्यांना खाद्य व औषधे पुरवण्यापर्यंतचे काम संबंधित कंपन्याच करतात. त्यामुळे मार्केटिंगसाठी अथवा अन्य कामासाठी धावपळ करावी लागत नाही. अनेक तरुणांनी शेडऐवजी घरातच खुले गावरान कोंबडी पालनाचा पर्याय निवडला आहे. ग्रामीण भागातील आठवडा बाजारासह जत्रांच्यावेळी या कोंबड्यांना मोठी मागणी असते.

मांसल कोंबड्यांच्या उत्पन्नासह कोंबड्यांच्या विष्ठेपासून मिळणार्‍या खतालाही शेतकरी वर्गातून मोठी मागणी असते. कमी गुंतवणुकीत चांगल्या उत्पन्नाची हमी असल्याने अनेक तरुणांनी गावरान कोंबडी पालनाचा पर्याय निवडला आहे. नोकरीच्या मागे न लागता कुक्कुटपालनच्या लघुउद्योगाकडे युवकांचा कल असल्याने बहुतांशी गावातून जागोजागी कुक्कुटपालनाच्या शेडची रेलचेल झाल्याचे दिसत आहे.