Mon, Aug 19, 2019 17:32



होमपेज › Kolhapur › हिरव्या सोन्याला आलीय झळाळी..!

हिरव्या सोन्याला आलीय झळाळी..!

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:50PM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

बाजारामध्ये नगदी मालाला नेहमीच उठाव मिळतो. यावर्षी नगदी पिकामधील अव्वल पीक मानले गेलेल्या उसाने जोरदार उसळी घेतली असून साखर पट्ट्यात जाहीर होणारे पहिल्या हप्त्याचे दर पाहता हिरव्या सोन्याने चांगलीच झळाळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्र मोठे असून या पट्ट्यामध्ये सध्या उसाचीच चलती आहे. सोन्याला ज्याप्रमाणे भाव वाढला की त्याची बाजारपेठेमध्ये चांगलीच झळाळी वाढली जाते. यावर्षी झळाळीचा मान उसासारख्या पिकाने मिळवला असल्यामुळे ऊस उत्पादक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीमध्ये साधारणपणे 2900 रुपयांपासून 3100 रुपयांपर्यंत पहिल्या हप्त्याचे दर जाहीर करण्यात आले असून अजूनही काही साखर कारखान्यांनी आपले पहिल्या हप्त्याचे दर जाहीर केलेले नाहीत. नजीकच्या दिवसात इतरही कारखाने पहिल्या हप्त्याचे दर जाहीर करण्याची चिन्हे आहेत. सोन्याच्या खणखणीत नाण्याप्रमाणेच हिरव्या-तांबड्या उसाचे टिपरे चांगलेच खणाणत आहे.

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी 2900  ते 3100 पर्यंत पहिल्या हप्त्याचे दर जाहीर केले आहेत. त्यांच्या आसपासच जिल्ह्यातील इतरही साखर कारखान्यांना चालावे लागणार असल्याने जिल्ह्यामध्ये पहिल्या हप्त्याचा चांगलाच बोलबाला राहणार आहे. 

बाजारपेठेमध्ये साखरेला चांगलाच उठाव असतो. साखर कारखान्यांकडून उद्योगजगतामध्येही साखरेची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सर्वसामान्य ग्राहक ज्या दराने साखर विकत घेतो, त्याच दराने औद्योगिक क्षेत्रातही साखर विकली जाते. औद्योगिक क्षेत्रामधील साखरेचा वापर उद्योजकांना त्यापासून प्रचंड नफा मिळवून देत असल्याने इंडस्ट्रीसाठी विकल्या जाणार्‍या साखरेचे दर सामान्य ग्राहकांना विकल्या जाणार्‍या साखरेपेक्षा जादा असायला हवेत, अशी दुहेरी साखर धोरण ठरविण्याची मागणी पुढे येत असली तरी  अद्यापही या मागणीवर सरकारने विचार केलेला दिसत नाही. असे झाले तर साखर कारखान्यांचा नफा वाढून ऊस उत्पादकांना जादा दर देणे सहज शक्य होणार आहे.