Wed, Jun 26, 2019 18:14होमपेज › Kolhapur › बारावीच्या पुनर्परीक्षा निकालात वाढ

बारावीच्या पुनर्परीक्षा निकालात वाढ

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या पुनर्परीक्षेत यावर्षीच्या निकालात 0.78 ने वाढ झाली असून निकालाची टक्केवारी 25.94 आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी 25.16 इतकी होती. यंदाही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 12.23 
आहे. 

कोल्हापूर विभागाचा बारावीच्या पुनर्परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि.24) दुपारी 1 वाजता प्रभारी विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी जाहीर केला. यावेळी प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, सातार्‍याचे शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाडेकर, सांगलीच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. बस्तवडे, लेखाधिकारी एस. एल. रेणके उपस्थित होते. 

कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील 25 परीक्षा केंद्रांवर 17 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत बारावीची लेखी पुनर्परीक्षा झाली. विभागातून 8124 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 8108 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून 2103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाची निकालाची टक्केवारी 25.94 आहे. मुला-मुलींच्या तुलनात्मक निकालाच्या टक्केवारीचा विचार करता यावर्षी विभागातून 6848 मुले परीक्षेला बसले. त्यापैकी 1646 उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण 24.04 टक्के आहे. पुनर्परीक्षेला बसलेल्या 1260 मुलींपैकी 457 मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्णतेची टक्केवारी 36.27 आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार यावर्षीही उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यास उत्तपत्रिकेच्या छायाप्रतीची मागणी विभागीय मंडळाकडे 27 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत करता येईल. त्यासाठीचा अर्ज मंडळाचे संकेतस्थळ व माध्यमिक शाळेत उपलब्ध होईल. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. छायाप्रत घेऊन जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मोबाईल आणि एसएमएसवरून माहिती कळविली जाणार आहे. एकदा उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिल्यानंतर त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळणार नाही. गैरमार्गाचा अवलंब केलेल्या विद्यार्थ्यांस माहिती अधिकाराखाली उत्तरपत्रिकेची छायाप्रत देता येणार नाही. उत्तरपत्रिकेची छायाप्रत कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्ध करता येणार नाही. 

गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना सोमवार 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर याकालावधीत अर्ज करता येतील. परंतु, अर्जासोबत गुणपत्रिकेची ऑनलाईन प्रत जोडणे आवश्यक आहे. उत्तपरत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन अर्ज विहीत नमुन्यात विभागीय मंडळाकडे करणे आवश्यक आहे. यापूर्वी तीन विषयांसाठी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन सुविधा मर्यादित होती, ती सहा विषयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.