Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Kolhapur › मैदानांचे तलाव अन् रखडलेले क्रीडा संकुल

मैदानांचे तलाव अन् रखडलेले क्रीडा संकुल

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:36AMकोल्हापूर : सागर यादव 

एकीकडे खेळाडू आपल्या रक्‍ताचे पाणी करून मैदान गाजवून आपले गाव, राज्य आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर चमकवत असल्याचे सकारात्मक चित्र आहे, तर दुसरीकडे  खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी  होत नसल्याचे नकारात्मक वास्तवही आहे. यामुळे खेळाडूंच्या प्रयत्नांना  मर्यादा येत आहेत.

मैदानांची दुरवस्था; निधीचा अभाव
खेळाडूंना घडविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती मैदानाची. मात्र, खुद्द क्रीडानगरी कोल्हापुरातील मैदानाची अवस्था अक्षरश: केविलवाणी आहे. काही खासगी संस्थांची मैदाने सोडली तर बहुतांशी मैदाने नावापुरतीच आहेत. महापालिकेच्या सर्व मैदानांची अवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. या मैदानांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. 

खेळाचे मैदान म्हणावे असे कोणतेही मैदान पहायला मिळत नाही.  एकाही मैदानाला ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पावसाळी पाणी मैदानातच साठून राहते. यामुळे मैदानांना अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त होते. अनेक मैदानात थेट गटारींचे पाणी साठते. यामुळे वर्षातील सुमारे सहा महिने मैदाने वापराविना पडून असतात. मैदानाचा वापर अनेक नागरिकांकडून कचरा कोंडाळ्यासारखा केला जातो. घरात नको असलेल्या वस्तू, दारूच्या बाटल्या अशा गोष्टी मैदान परिसरात फेकून दिल्या जातात. आपली मुले-बाळेच या मैदानांवर खेळणार आहेत इतकी सोपी गोष्टही त्यांच्या ध्यानी येत नाही. 

खेळासंदर्भातील प्रकल्प प्रलंबित...
जलतरण तलावांचीही मैदानांप्रमाणेच अवस्था आहे. काही तलाव नियोजनाअभावी बंद पडले आहेत. काही तलावांचे खासगीकरण झाले आहे. सुरू असणार्‍या तलावांतील पाण्याचे फिल्टरेशन व्यवस्थित होत नाही. तलावातील फरशा, चेजिंग रूम, स्वच्छता अशा अनेक गोष्टींची कमतरता आहे. यामुळे कोल्हापुरातील जलतरणपटूंना व नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठीच्या सरावासाठी कोल्हापूर सोडून इतरत्र जावे लागते. हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळातही कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मेजर ध्यानचंद सारख्या मैदानांची उभारणी हॉकी संघटनेने आणि खेळाडूंनी स्वबळावर केली आहे. अशा हॉकी मैदानाला संरक्षणाबरोबरच अत्याधुनिक अ‍ॅस्ट्रोटर्फची केवळ आश्‍वासनेच शासनाकडून मिळतात.

क्रीडा संकुलाचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार? 
  विविध खेळांत यशाची प्रदीर्घ परंपरा जपणार्‍या कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुल व्हावे यासाठीच्या मागणीसाठी इथल्या लोकांना झगडावे लागले. याला  शासनाने कशीबशी मान्यता दिली. याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. पाच जिल्ह्यांसाठीच्या विभागीय क्रीडा संकुलाची अशी अवस्था.  मग तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचा केवळ विचारच केलेला बरा. अनेक तालुका क्रीडा संकुले अर्धवट व अपुरी आहेत. कोल्हापूरचे वैभव असणारा देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रीडा कीर्ती स्तंभ 1980 पासून अपडेट झाला नसल्याचे वास्तीव आहे. 

खेळाडू मानधनापासून वंचित
आयुष्यभर मैदान गाजविणार्‍या ज्येष्ठ खेळाडूंना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे विविध प्रकारचे मानधन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, ते त्यांना वेळेवर मिळत नसल्याचे वास्तव आहे. खेळाडूंची नवी पिढी घडविण्यासाठी क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्याचे मानधनही वेळेत दिले जात नाही. क्रीडा क्षेत्राचा चौफेर विकास व्हावा यासाठी शालेय स्तरापासून मुलांत खेळाची आवड जोपासावी, असे शालेय धोरण आहे. मात्र, बहुतांशी शाळेत शारीरिक शिक्षणाचे तास होत नसल्याचे वास्तव आहेत. अनेक शाळांत तर शारीरिक शिक्षणासाठी शिक्षकच नाहीत. यामुळे क्रीडा विकास होणार तरी कधी? आणि कसा, असा प्रश्‍न विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमोर उभारला आहे. 

खेळाडूंना पोषक आहाराचीही वानवा
खेळाडूंना पोषक आहाराची नितांत गरज असते. मात्र, वाढती महागाई, उत्पन्‍नाच्या मर्यादा, शासकीय योजनांचा अभाव, मानधनासाठीची दिरंगाई अशा विविध गोष्टींमुळे खेळाडूंना पोषक आहारापासून वंचित रहावे लागत आहे. याचा थेट परिणाम खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरच होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.  

क्रीडा विभाग नावालाच...
क्रीडानगरी अशी ओळख असणार्‍या कोल्हापुरातील विविध क्रीडा विभाग नावापुरतेच असल्याचे वास्तव आहे. स्थानिक महापालिकेचा स्वतंत्र क्रीडा विभाग गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडला आहे. यामुळे त्या अंतर्गत येणारी मनपाची मैदाने, व्यायामशाळा, जलतरण तलाव यांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा प्रबोधिनीत अपुर्‍या मनुष्यबळामुळे अधिकार्‍यांची इच्छा असूनही अनेक गोष्टी राबविणे केवळ अशक्य गोष्ट आहे. कोल्हापुरात क्रीडा उपसंचालक कार्यालय असूनही ज्या पद्धतीने येथे योजना राबविणे गरजेचे आहे त्या प्रमाणात त्या राबविल्या जात नाहीत. अतिरिक्‍त पदामुळे अधिकार्‍यांना मर्यादा येत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचीही काहीशी अशीच तर्‍हा आहे.