Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Kolhapur › अंबाबाई रथोत्सवाचे माहात्म्य

अंबाबाई रथोत्सवाचे माहात्म्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चैत्र पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी भरणारा करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव आज होत आहे. रथोत्सवाच्या निमित्ताने संस्थानकालीन परंपरा अनुभवण्यास मिळते. अंबाबाईचे तसेच संस्थानकालीन वैभव भाविकांना पाहण्यास खुले करण्याच्या उद्देशानेच या रथोत्सवास आता लोकोत्सवाचे स्वरूप आले आहे. 2010 पासून चांदीच्या रथातून देवी दर्शन देण्यासाठी बाहेर पडते. चांदीच्या रथातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते. कोल्हापुरातील रथोत्सवास जुनी परंपरा आहे. जोतिबाची यात्रा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रथोत्सव होतो. 1914 साली रथोत्सव सुरू करण्यात आला. पूर्वी रथोत्सवासाठी लाकडी रथ वापरला जात होता. अंबाबाई मंदिराची उभारणी करताना ज्या घटकांचा अभ्यास केला होता तो रथासाठीही वापरण्यात आला आहे. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, वाद्ये, छत्रपतींचा लवाजमा, लष्करातील जवान, शासकीय अधिकारी यांचा पूर्वी सहभाग असे. आता भाविकांकडून हा रथ ओढला जातो. रथमार्ग सुशोभित केला जातो. नयनरम्य आतषबाजीही केली जाते. नयनरम्य रांगोळ्या काढल्या जातात.

कोल्हापूरमध्ये विविध उत्सवांत श्री अंबाबाईच्या रथोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. हा उत्सव अश्‍विन शुक्ल अष्टमी अथवा अश्‍विनी पौर्णिमा या दिवशी होत असे. पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत यामध्ये बदल झाला. राजर्षी शाहूंचे दोन्ही पुत्र (छ. राजाराम व शिवाजी) शिक्षणासाठी जेव्हा इंग्लंडमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या आरोग्यासाठी आणि शैक्षणिक यशासाठी राजर्षी शाहूंनी श्री अंबाबाई देवीला रथोत्सवाचा नवस केला होता. या नवसानुसार त्यांनी पहिला रथोत्सव 19 जानेवारी 1914 या दिवशी साजरा केला. पुढे हाही दिवस बदलला. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी वाडी रत्नागिरी येथे डोंगरावर जोतिबाची मोठी जत्रा भरते. या यात्रेसाठी हजारो पर्यटक येतात, त्यांना श्री अंबाबाई रथोत्सव पाहण्यास यावा म्हणून कोल्हापुरात रथोत्सवाचे आयोजन चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी करण्यात येऊ लागला. चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी सायंकाळी फुलांनी तसेच विद्युतदिव्यांनी सजवलेल्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती रथारूढ केली जाते.

या रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळ्या घालून रस्त्याच्या दुतर्फा सुवासिनी आरती घेऊन उभ्या असतात. ठिकठिकाणी शोभेच्या दारूची आतषबाजी चालू असते. बँडची पथके, लेझीम-पथके, ढोल वादक, चौर्‍या व मोर्चेल धरणारे सेवक अशा राजवैभवी लवाजम्यासह हा रथ महाद्वार मार्ग, गुजरी, भवानी मंदिर, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, रंकभैरव या क्रमाने मिरवणूक मध्यरात्री मंदिरात पोहोचते. हा रथोत्सव पाहण्यासाठी विदेशी पर्यटकही उपस्थित राहतात.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Greatness,  Ambabai, Rath Mahotsav, Ambabai Temople, Kolhapur 


  •