Tue, Apr 23, 2019 23:58होमपेज › Kolhapur › अनुदान ‘गडप’ ; सुविधांची मात्र वाणवा

अनुदान ‘गडप’ ; सुविधांची मात्र वाणवा

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 11:52PMकागल : बा. ल. वंदूरकर

शहराबरोबरच ग्रामीण भागातही सध्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलपंप सुरु करण्यात आले आहेत. मात्र नव्या आणि जुन्या अशा अनेक पेट्रोल पंपांवर निर्धारीत सुविधांचा अभाव असतो. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अग्नीरोधक यंत्रणा, तक्रार निवारण पुस्तिका, प्रथोमोपचार पेटी आणि हवेची सुविधा यांची वाणवा आहे. याकडे पंप चालक, मालक आणि कंपनीचे विक्री अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

पंपावरील स्वच्छतागृहे तसेच अन्य काही सुविधांना शासन पेट्रोलपंप चालकांना अनुदान देत असते. त्यामुळे ग्राहकांंसाठी सुविधा निर्माण करणे बंधनकारक असतानाही याकडे अनेक पेट्रोल पंपचालक दुर्लक्ष करीत आहेत. काही ठिकाणी पंपावरील कर्मचार्‍यांना या सोयी सुविधांची माहितीही नसते. तर काही ठिकाणी केवळ शासनाची सक्ती आहे म्हणून स्वच्छतागृहे बांधुन ठेवली आहेत. त्याचा वापर केला जात नाही तर काही पंपांवर केवळ कर्मचारीच त्यांचा वापर करतात. ग्राहकांना त्यांची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. चौपदरी महामार्गावरील काही पंपांवर सुविधा आहेत, मात्र त्या दिल्या जात नाहीत. शहरातील पंपांवर सुविधा आहेत, मात्र अडचणीच्या ठिकाणी आहेत. त्या शोधुनही सापडत नाहीत अशा ठिकाणी असतात. त्यामुळे ग्राहकांचे फारच हाल होत आहेत. स्वच्छता कोणी करायची म्हणुन स्वच्छतागृहांना कुलूप ठोकलेले असते.

पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहासह पिण्याचे पाणी असणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवलेले नाही. असेलच तर ते कर्मचार्‍यांच्यासाठी असते अशा सुविधा नेमक्या कोणासाठी असतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तक्रार करायला तक्रार बुकही ठेवलेले नसते. मागणी केल्यानंतर वादावादी केली जाते. हवा भरण्याची सुविधा तर बहुतांशी ठिकाणी नाही. ग्राहकांची गर्दी होणार्‍या ठिकाणी हवा आणि पंक्चर काढण्याची सोय असते. तीही कोणाला तरी चालविण्यास दिलेली असते. हवा भरण्यासाठी पैशाची आकारणी केली जात आहे.

पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे ही अतिशय स्वच्छ, नीटनेटकी व अत्याधुनिक असावीत. महिला, पुरुष आणि अपंगांना स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक असताना एकच स्वच्छतागृह सर्वांसाठी वापरले जाते. अनेक दिवस पाणीही मारले जात नाही. रस्त्यावर दुर्गंधी सुटलेली असते. अग्नीरोधक यंत्रणा अत्याधुनिक स्वरुपाची बसविण्यात येत नाही. काही ठिकाणी तर याचा पत्ताच नाही. वाळुनी भरलेल्या बादल्याही काढुन टाकल्या आहेत. ज्या ठिकाणी आहेत तिथे गुटखा, तंबाखू, पान खावुन थुंकण्यासाठी तसेच बिडी सिगारेट ओढुन टाकण्यासाठी त्याचा वापर होत आहे.

ग्रामीण भागातील काही मार्गावर सध्या संघ, संस्था, कारखाने यामुळे वाहनांची रहदारी वाढु लागली आहे. त्यामुळे  जिल्हा आणि ग्रामीण प्रमुख मार्गावरही पेट्रोलपंपाची संख्या वाढली आहे. 
मात्र, तिथे सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे संबंधित कंपनीचे अधिकारी भेट देऊन पाहणी करतात की, नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कंपनीच्या विक्री अधिकारी यांच्या बरोबरच नगरपालिका, केंद्रीय भरारी पथक, तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांचेही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.