Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Kolhapur › अनुदान देता का अनुदान!

अनुदान देता का अनुदान!

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 28 2018 11:44PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

मराठी चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अर्थसहाय्य योजनेतील रक्कम मिळवण्यासाठी निर्मात्यांकडून मंत्रालयाच्या पायर्‍या झिजविल्या जात आहेत. शासनाने सप्टेंबर 2017 साली 

7 कोटी 20 लाख  रुपयांपैकी केवळ 78 लाख रुपये इतकीच रक्कम निर्मात्यांना दिली आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम कधी मिळणार, असा सवाल निर्मात्यांमधून उपस्थित केला जात आहे. 

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने  मराठी चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे म्हणून अनुदान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अ व ब असा चित्रपटांचा दर्जा ठरवण्यात आला. चित्रपटांचा दर्जा ठरवण्यासाठी  मराठी चित्रपट परीक्षण समिती तयार करण्यात आली. या समितीच्या शिफारशीप्रमाणे चित्रपटांना अनुदान देण्यात आले. अ वर्ग चित्रपटाला 40 लाख, ब वर्गसाठी 30 लाख अनुदान निश्‍चित करण्यात आले. अनुदान मिळेल, या अपेक्षेने प्रत्यक्षात चित्रपट निर्माण करत असताना अनेकवेळा कर्ज काढून निर्माता चित्रपटनिर्मितीचे धाडस करतो. 

अनुदान योजनेमुळे मराठी चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन मिळत गेले. या अनुदान योजनेचा लाभ घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत नवीन निर्माते तयार होऊ लागले. त्यांच्याकडून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. शासनाच्या पाठबळामुळे पुन्हा नवीन चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन मिळत गेले. सप्टेंबर 2017 साली शासनाने एकूण 23 चित्रपट अनुदानास पात्र ठरवले. यापैकी अ दर्जाचे 3 व ब दर्जाचे 20 चित्रपट अनुदानास पात्र ठरवले.  दर्जानुसार या चित्रपटांना 7 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात 7 कोटी 1 लाख रुपये इतकी रक्कम अनुदानास पात्र ठरवण्यात आली. त्याप्रमाणे रक्कम मिळणे अपेक्षित होते.

पण, प्रत्यक्षात अ दर्जाच्या चित्रपटांना 40 लाख रुपयांऐवजी 4 लाख रुपये, तर ब दर्जा प्राप्त चित्रपट निर्मात्यांना 30 लाखांऐवजी 3 लाख 33 हजार रुपये देण्यात आले. एकूण 7 कोटी 1 लाख रुपयांपैकी 
78 लाख 67 हजार रुपये इतकीच रक्कम देण्यात आली. उर्वरित निधीचे वितरण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्यानंतर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही तरतूद होणार कधी? व अनुदान मिळणार कधी? याच्या प्रतीक्षेत निर्माते आहेत.