होमपेज › Kolhapur › ग्रामसेवक बदलीही आता ऑनलाईन

ग्रामसेवक बदलीही आता ऑनलाईन

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:47AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांप्रमाणे आता ग्रामसेवकांच्या बदल्याही ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बदली प्रक्रियेला ग्रामसेवक संघटनांचा विरोध आहे.

शासनाची कोणतीही योजना गावांपर्यंत पोहोचविण्याच्या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामसेवकांच्या बदल्यांमध्येदेखील वशिलेबाजी चालत असल्याची चर्चा आहे. ज्याचा वशिला आहे तो ग्रामसेवक शहराच्या आठ ते दहा किलोमीटरपर्यंत नोकरी करतो आणि त्याच ठिकाणी निवृत्त होतो. ज्याचा वशिला नसेल तो डोंगराळ, दुर्गम भागातच कायम राहतो. ग्रामसेवकांच्या बदल्यांमध्येदेखील अर्थपूर्ण चर्चा होत असल्याचे बोलले जाते. वशिलेबाजी, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकणार्‍या शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांमध्येही असे लोक आढळून येतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना त्यांच्या मनाप्रमाणे ठिकाण मिळावे म्हणून येत्या वर्षापासून ग्रामसेवकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

ग्रामसेवकांपेक्षा सात, आठ पटीने शिक्षकांची संख्या अधिक आहे. असे असताना शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्याला काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात फारसे यश आले नाही. शासन आपल्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांच्या बदल्याही ऑनलाईन करण्याचा ग्रामविकास खात्याचा विचार सुरू आहे. मात्र, त्याला आमचा विरोध राहील. नंदुरबार येथे जुलै महिन्यात ग्रामसेवक संघटनांच्या प्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक होणार आहे. 
- साताप्पा मोहिते