Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Kolhapur › धान्याची दारू : प्रकल्प आणि अनुदानाच्या सखोल चौकशीची गरज

धान्याची दारू : प्रकल्प आणि अनुदानाच्या सखोल चौकशीची गरज

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:12AMकोल्हापूर : सुनील कदम

राज्यात तयार होणार्‍या धान्यापासूनच्या दारूला राज्य शासन दरवर्षी करोडो रुपयांचे अनुदान देत आहे. मात्र, राज्यात तयार होणारी धान्याची दारू, अशी दारू तयार करणारे प्रकल्प, या प्रकल्पांमध्ये खरेच धान्यापासून दारू तयार होते का आणि शासनाकडून दिले जाणारे अनुदान या सगळ्याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. 

राज्यात धान्यापासून तयार होणार्‍या दारूला राज्य शासन दरवर्षी जवळपास 400 ते 500 कोटी रुपयांचे अनुदान देत आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने 2008 मध्ये राज्यात उसाच्या मळीऐवजी धान्यापासून दारू तयार करणार्‍या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्याचप्रमाणे अशा प्रकल्पांमध्ये तयार होणार्‍या दारूला प्रतिलिटर प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचाही निर्णय घेतला होता. राज्यात आजघडीला धान्यापासून दारू तयार करणारे 36 प्रकल्प आहेत. या प्रत्येक प्रकल्पाची दररोजची गाळप क्षमता 80 टन धान्याची आहे. सर्व प्रकल्पांना मिळून वर्षाकाठी जवळपास 10 ते 11 लाख टन धान्य लागते. राज्यातील या प्रकल्पांची दररोजची दारूनिर्मिती क्षमता प्रत्येकी 30 ते 35 हजार लिटर आहे. शासन या प्रकल्पांमध्ये तयार होणार्‍या दारूला प्रतिलिटर 10 रुपयांचे अनुदान देते. याचा अर्थ शासन प्रत्येक प्रकल्पाला दररोज 3 ते 3.50 लाख रुपयांचे अनुदान देत आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांचा विचार करता सर्व प्रकल्प मिळून वर्षाकाठी 38.88 कोटी लिटर ते 45.36 कोटी लिटर दारू तयार करतात. प्रतिलिटर 10 रुपयांचे अनुदान विचारात घेता या प्रकल्पांना वर्षाकाठी 380 ते 450 कोटी रुपयांचे अनुदान मिळत आहे. 

यामधील एक गंभीर आणि शंकास्पद बाब म्हणजे या प्रकल्पांमध्ये केवळ धान्यापासूनच दारू तयार केली जाते, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. या प्रकल्पांचे आणि त्यातील दारू निर्मितीचे कोणतेही अधिकृत रेकॉर्डच राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे मळीची दारू गाळून धान्याच्या दारूचे अनुदान लाटले जात नसेल कशावरून? कारण, धान्यापासून दारू तयार करणारे बहुतेक सगळे प्रकल्प साखर सम्राटांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या अथवा अन्य संबंधितांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये तयार होणारी दारू ही नेमकी धान्याची का मळीची, याचीही झाडाझडती घेण्याची गरज आहे.