कोल्हापूर : प्रतिनिधी
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा भाईंदरच्या खाडीत शोध घेऊनही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने नवी मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक ‘ग्रॅडीओमीटर’ उपकरणाची मदत घेण्याचा विचार सुरू केला आहे. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर झाल्यास दिवसाला दोन लाख रुपयाचे भाडे पोलिसांना मोजावे लागणार आहे.
समुद्रात खोलवर खोदकाम करणार्या अनेक कंपन्यांबरोबर नवी मुंबई पोलिसांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ग्रॅडीओमीटर उपकरणाच्या सहाय्याने खाडीतील खोलवर गाळामध्ये अडकलेल्या सूक्ष्म अशा बारीकसारीक वस्तूंचाही शोध घेता येणार आहे, असेही सांगण्यात आले.
प्लास्टिकच्या पिशवीत बांधून तसेच त्याला वजनदार वस्तू बांधून मृतदेहाचे तुकडे खाडीत टाकण्यात आलेल्या घटनेला तब्बल 22 महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे मृतदेहाचे तुकडे खाडीतील खोलवर गाळात रूतलेले असावेत, असा तपाधिकार्यांचा संशय आहे. तपास यंत्रणेत हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
समुद्रात खोदकाम करणार्या मुंबईतील एका कंपनीने नवी मुंबई पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला आहे. मॅग्नेटोमीटर मशिनच्या सहाय्याने खाडीतून तुकड्यांचा शोध घेण्याची त्यांनी तयारी दर्शविली. तसा प्रस्तावही संबंधित कंपनीने तपासाधिकार्यांकडे सादर केला आहे. प्रस्तावांतर्गत या कंपनीने मोबिलायझेशनचे 66 हजार, रिपोर्ट तयार करण्याचे 33 हजार, खाडीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यासाठी 1 लाख 4 हजार रुपये असे चार्जेस दिले आहेत.
एका प्रख्यात सर्व्हिसेसचे काम करणार्या संबंधित कंपनीकडे मॅग्नेटोमीटर मशिनच्या माध्यमातून भाईंदर खाडीतील गाळाच्या वरच्या बाजूचाच शोध घेता येत असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी प्रस्तावाला नकार दिल्याचे समजते. मात्र, ग्रॅडीओमीटर उपकरणाच्या सहाय्याने गाळाच्या खाली रूतून बसलेल्या व सूक्ष्म वस्तूंचा शोध घेता येणे शक्य आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी हे उपकरण असलेल्या कंपन्यांचा शोध चालविला आहे, असेही सांगण्यात आले.
Tags : kolhapur, kolhapur news, ashwini bindre, murder, GradioMeter, abhay Kurundkar,