Tue, Jun 25, 2019 22:11होमपेज › Kolhapur › सारंग अकोळकर, विनय पवार अजूनही मोकाट

सारंग अकोळकर, विनय पवार अजूनही मोकाट

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी फरारी संशयित सारंग अकोळकर (रा. पुणे), विनय पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) यांचा अद्यापही तपास यंत्रणेला छडा लागलेला नाही. हत्येच्या घटनेला सव्वा दोन वर्षांचा कालावधी होऊनही दोनही मारेकरी मोकाट राहिल्याने तपास यंत्रणा अकार्यक्षम ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. तपास पथकाने या गुन्ह्यातील फरारी मारेकरी अमोल काळे ऊर्फ भाईसाब (वय 37, रा. पुणे) याच्यासह चौघांची चिंचवड येथे मुसक्या आवळत अटकेची कारवाई केली आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह राज्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे कॉ. पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणेकडे लक्ष लागले आहे.

कॉ. गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने सनातनचे साधक समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी समीरची जामिनावर सुटका झाली आहे. डॉ. तावडे सीबीआय कोठडीत आहे. पानसरे हत्येच्या कटात अकोळकर, पवारचा सहभाग यापूर्वीच निष्पन्न झाला आहे.

संशयिताच्या अटकेसाठी एसआयटीसह राज्य पोलिस दलामार्फत शोधमोहीम राबविण्यात येऊनही मारेकरी अद्यापही हाताला लागलेले नाहीत. किंबहुना, दोघांचा ठावठिकाणाही पथकाला लागलेला नाही. एकीकडे गौरी लंकेश हत्येचा तपास गतीने सुरू असतानाच, दुसरीकडे मात्र कॉ. पानसरे हत्येतील दोघा फरारी मारेकर्‍यांचा सव्वा दोन वर्षांत सुगावा लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.