Mon, Nov 19, 2018 04:25



होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यास शासनाकडून चालढकल : आ. क्षीरसागर

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यास शासनाकडून चालढकल : आ. क्षीरसागर

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:12AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटवून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी जून महिन्यापासून जनआंदोलन सुरू आहे. विधानसभा सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्‍नास उत्तर देताना, राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून हिवाळी अधिवेशनापूर्वी शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिरात शासनाने पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात येणार असल्याची ग्वाही विधी व न्याय राज्यमंत्री ना. रणजित पाटील यांनी दिली होती. 

या मूळ मुद्द्याला बगल देऊन पगारी पुजारी नेमण्याचा प्रश्‍न भिजत ठेवण्याचा डाव शासनाने आखला असून, अधिवेशन संपत आले तरी या प्रश्‍नावर साधी चर्चा करण्याची तसदी शासनाने घेतलेली नाही. याविषयी तीव्र आंदोलन उभे करून शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा आमदार  राजेश क्षीरसागर यांनी हिवाळी अधिवेशनात दिला.

श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार रमेश लटके यांनी ‘शासनाचा कासव गतीचा कारभार..श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक कायद्यावर शासन का गप्पगार’ अशा आशयाचा फलक घेऊन विधानभवनाच्या पायर्‍यावर धरणे आंदोलन केले.

पगारी पुजारी नेमण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी शासनाला अहवाल सादर  करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना दिले होते.  परंतु, कोणताही निष्कर्ष न काढता हा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर केला आहे. हा अहवाल सादर करताना पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु या आश्‍वासनाची आजतागायत पूर्तता करण्यात आलेली नाही..