Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Kolhapur › ‘शिक्षण वाचवा’साठी कोल्हापुरात महामोर्चा

‘शिक्षण वाचवा’साठी कोल्हापुरात महामोर्चा

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारी शाळा बंद व खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या शासनाच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात शुक्रवारी (दि. 23) गांधी मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार आहे. लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करणार आहेत. महामोर्चा दिवशी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती शैक्षणिक व्यासपीठ व शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने  एस. डी. लाड, अशोक पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

महामोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत. खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता होईल. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात येणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी शहर व तालुकास्तरावर बैठका सुरू आहेत. मोर्चावेळी बंद असणारे शालेय कामकाज शाळेच्या सुट्टीच्या दिवशी भरून काढण्यात येणार असल्याचे शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी दादासाहेब लाड, भरत रसाळे, सुरेश संकपाळ, संतोष आयरे, प्रमोद तौंदकर, सुधाकर निर्मळे, रमेश मोरे, गिरीश फोंडे, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.
 

tags : Kolhapur,news,Government, schools, closed,in Kolhapur, protest, march,