Tue, Apr 23, 2019 19:58होमपेज › Kolhapur › अशैक्षणिक धोरणप्रश्‍नी तिरडी मोर्चा

अशैक्षणिक धोरणप्रश्‍नी तिरडी मोर्चा

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारी शाळा बंद व खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या शासनाच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत शिक्षिका व पालकांनी महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढला. 

राज्य शासनाने कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी देणारे विधेयक विधान परिषदेत मांडले आहे. दहा पटाच्या आतील 1,314 शाळा बंद केल्या आहेत व टप्प्याटप्प्याने 30 पटाच्या व त्यानंतर त्यावरील पटाच्या शाळा बंद करण्याचे शासन धोरण प्रस्तावित आहे. याच्याविरोधात कृती समितीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी (दि. 17) शिक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने महिलांनी प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढला.

बिंदू चौकातून महिला मार्चला सुरुवात झाली. महिलांनी ‘शिक्षणाचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे’, ‘शिक्षण आमच्या हक्‍काचे’, ‘राजर्षी शाहूंच्या विचारांना विरोध करणार्‍या मंत्र्यांचा निषेध असो’, ‘शिक्षणमंत्री, पालकमंत्री राजीनामा द्या,’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिला, कॉलेजमधील विद्यार्थिनींनी फलकांद्वारे शासनाचा निषेध करीत शंखध्वनी केला. महिला  पालक, विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. महिला मार्चमुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात नगरसेविका निलोफर आजरेकर, सुवर्णा तळेकर, अनिता नवाळे, राजश्री चौगले, आफरिन सय्यद यांच्यासह आदी उपस्थित होते.

URL : Government schools, closed, private schools, allowed, start schools