Wed, Aug 21, 2019 02:02होमपेज › Kolhapur › उपक्रमशील शिक्षकांमुळे सरकारी शाळा ‘लय भारी’

उपक्रमशील शिक्षकांमुळे सरकारी शाळा ‘लय भारी’

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 12:27AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

 महापालिका व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याची ओरड होते. याला मात्र महापालिकेच्या काही शाळा उपक्रमशील शिक्षकांमुळे अपवाद ठरल्या आहेत. पटसंख्या वाढल्याने काही शाळा दोन शिफ्टमध्ये चालविल्या जात असून त्या ‘लय भारी’ ठरल्या आहेत. 

महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शहरात 59 शाळा चालविल्या जात असून, दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. टेंबलाईवाडी विद्यालयात पहिली ते सातवीपर्यंत सेमी इंग्रजीत शिक्षण दिले जाते. गेल्या वर्षी पटसंख्या 680 होती. यावर्षी यात वाढ होऊन पटसंख्या 750 झाली आहे. गतवर्षी शाळेतील वर्धन माळी या विद्यार्थ्याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी गटात गुणवत्ता यादीत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला होता. 

विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्ट सांगण्याबरोबरच परिसर भेट, वनभोजन यासारखे नावीण्यापूर्ण उपक्रम शिक्षकांकडून राबविले जातात. काही विद्यार्थी व शिक्षकांनी वर्षभर सुट्टी घेतली नाही. विद्यार्थ्यांकडून कठीण अभ्यास कोणताही तणाव न घेता शिक्षकांनी करून घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे विद्यार्थी संख्या वाढली असून शाळा दोन शिफ्टमध्ये चालवावी लागत आहे.

जरगनगर परिसरातील पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण देणारी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर ही शाळा गुणवत्तेमुळे वेगळी ठरली आहे. गतवर्षी 1458 पट होता. यावर्षी विद्यार्थी संख्या 1604 वर पोहोचली आहे. शाळेतील एका उपक्रमशील शिक्षकाने मोबाईल अ‍ॅपद्वारे विद्यार्थांना शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन केले. इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणार्‍या परीक्षांची तयारी करून घेतली. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी राज्यस्तरावर आणि 26 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तीन वर्षांपूर्वी ही शाळा दोन शिफ्टमध्ये चालविली जात होती. मात्र, काही पालकांच्या तक्रारीनंतर शिफ्ट पद्धत बंद करण्यात आली. महापालिकेच्या शाळांमधील गरिबीतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जेेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करीत आहे. महापालिका शाळांना सोयीसुविधा व समाज घटकांनीही अशा उपक्रमशील शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याची गरज आहे.