Wed, Jul 17, 2019 08:19होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण देण्यास सरकार बांधिल : ना. चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण देण्यास सरकार बांधिल : ना. चंद्रकांत पाटील

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:02PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी सरकार बांधील आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत येईल, त्यानंतर दि. 30 नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भातील संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जनतेने शासनावर विश्‍वास ठेवून शांततामय पद्धतीने आंदोलन करावे, असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी आहे. या कालावधीत अनेक सरकारे आली. या सर्वांवर जनतेने विश्‍वास ठेवला. आता गेल्या चार वर्षांत या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही खूप काही केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण मिळाल्यानंतर ज्या सुविधा द्याव्या लागणार आहेत त्या सुविधा आतापासूनच देण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्‍न 8 लाखांपर्यंत आहे, त्यांची निम्मी फी शासन भरत आहे. आतापर्यंत 2 लाख 56 हजार विद्यार्थ्यांची 6 कोटी 54 लाखांची फी शासनाने भरली आहे. मराठा समाजातील तरुण-तरुणींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज  उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कर्जाची हमी राज्य शासनाने घेतली असून, कर्जावरील संपूर्ण व्याज शासन भरणार आहे. बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्था शासनाने स्थापन केली असून, मराठा समाजातील पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप, तसेच यूपीएससी, एमपीएससी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत दिली जाणार आहे. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 मुलांचे आणि 100 मुलींचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. राज्यातील पहिले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह कोल्हापुरात सुरू केले असून, महिन्याभरात राज्यातील 10 जिल्ह्यांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात येतील. पुणे येथे मुलींचे वसतिगृह सुरू केले असून, महिन्याभरात मुलांचेही सुरू होईल. कोल्हापुरात सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या वसतिगृहात 92 विद्यार्थ्यांची क्षमता असून, सध्या 19 विद्यार्थी राहत आहेत. लवकरच त्यांचीही संख्या वाढेल, असे सांगत कोल्हापुरातही लवकरच मुलींसाठीही वसतिगृहाची उभारणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ध्वजारोहण कार्यक्रमात दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातच दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्‍कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी घडली. विभागीय आयुक्‍त कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात या घटना घडल्या. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे.  पालकमंत्री सावंत यांचे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आगमन झाल्यानंतर बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाडे, पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर दुसर्‍या एका घटनेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्‍नड तालुक्यातील भगवान वारे या शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.