Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Kolhapur › सरकार घराणीही आंदोलनात

सरकार घराणीही आंदोलनात

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेल्या वर्षभरापासून आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी सरकार घराण्यांनीही आपल्या मराठा बांधवांसाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात जिल्ह्यातील सरकार घराण्यांची गुुरुवारी सायंकाळी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक  झाली. यात दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहकुटुंब सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता कावळा नाका येथे एकत्र येण्याचे निश्‍चित  करण्यात आले. करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणीच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुुरुवात करण्यात येणार आहे. रॅलीचा समारोप ऐतिहासिक दसरा चौकात होईल. यावेळी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वजण ठिय्या आंदोलनात सहभागी होतील.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. लाखाचे मोर्चे काढूनही शासन मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा देत पुन्हा आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण बलिदान देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता सरकार घराण्यांनीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उतरण्याचे ठरविले आहे.

बैठकीस रविराज निंबाळकर, आदिराज डफळे, संजय घाटगे (वंदूरकर), विजयसिंह शिंदे, धनराज शिंदे, विनायक घोरपडे,  सौ.मनीषादेवी घोरपडे-जाधव, सौ. तेजस्विनीदेवी घोरपडे, इंद्रजित गायकवाड, विरेंद्रसिंह माने, संग्रामसिंह निंबाळकर, संग्रामसिंह चव्हाण-हिम्मतबहाद्दर आदी उपस्थित होते.