Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Kolhapur › ...तर सरकारी डॉक्टरांची डिग्री नोंद होणार रद्द

...तर सरकारी डॉक्टरांची डिग्री नोंद होणार रद्द

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील सरकारी दवाखाने किंवा रुग्णालयांत कर्तव्यावर असलेला  वैद्यकीय अधिकारी विनापरवानगीने गैरहजर राहिल्यामुळे तेथे रुग्णाचा किंवा प्रसूतीदरम्यान मातेचा/बाळाचा मृत्यू झाल्यास त्याची वैद्यकीय डिग्री नोंद रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे. तसेच त्याला तत्काळ कामावरून निलंबित करण्यात येणार आहे. इतर वेळीही कर्तव्यावर हजर न राहणार्‍या डॉक्टरांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा तुटवडा जाणवत असल्याच्या विषयासंदर्भात विधान परिषदेत 16 जुलैला चर्चा झाली. याच चर्चेत गैरहजर राहणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याबाबतही ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता शासकीय दवाखान्यांत वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहणार्‍या कामचुकार डॉक्टरांवर चाप बसण्यास मदत होणार आहे. याआधीदेखील दांडीबहाद्दर डॉक्टरांंवर उपाययोजना म्हणून शासनाने बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली होती; पण तरीदेखील दांड्या मारण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य केंद्र व रुग्णालय येथे डॉक्टर उपस्थित राहत नसल्याची नेहमीच ओरड होते. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचार मिळत नाहीत. काही वेळा अपघात, हृदयविकार, सर्पदंश किंवा प्रसूतीसाठी महिला आदी तातडीचे रुग्ण येतात. अशा रुग्णांना तातडीने पुढील उपचार किंवा औषधे मिळणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे हे उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा या रुग्णांचा सरकारी दवाखान्यांत मृत्यू झाल्याचीही उदाहरणे समोर आलेली आहेत. मात्र, त्याबाबत जबाबदार डॉक्टरांवर फारशी कारवाई होत नाही. म्हणून आता अशा दांडीबहाद्दर डॉक्टरांवर या निर्णयामुळे चाप बसण्यास मदत होणार आहे.