Sun, Mar 24, 2019 09:01होमपेज › Kolhapur › शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत शासन सकारात्मक

शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत शासन सकारात्मक

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:06PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक व शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत शासन सकारात्मक आहे. प्रलंबित प्रश्‍नी लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने रविवारी आयोजित महामंडळ सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजीराव पाटील होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, शैक्षणिक व शिक्षकांचे सर्व प्रश्‍न माहीत आहेत. व्यावहारिक अडचणीमुळे काही मागण्या बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित राहिल्या आहेत. राज्यातील शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याने आर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पन वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही बदल्याची ब्रिटिश काळापासूनची तीच पद्धत सुरू आहे. एमएससीआयटी मुदतवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल. केंद्राने लागू केलेल्या दिवसापासून राज्य सरकार सातवा वेतन लागू आयोग करणार आहे, त्यामुळे उशीर झाला तरी काळजी करू नये. जुनी पेन्शन, नगरपालिका व महापालिका शिक्षकांचे सरकारी अनुदानातून शंभर टक्के पगार हे प्रश्‍न सोडविले जातील. 

माजी आ. शिवाजीराव पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षकांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, राज्यातील शिक्षक असमाधानी आहेत. बदल्यांमुळे शिक्षक हैराण झाले असून संसार विस्कटले आहेत. त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी बदल्या व्हाव्यात. जगण्याचे साधन म्हणून वृद्धापकाळात पेन्शन असणे गरजेचे आहे. ‘एमएससीआयटी’ करण्यास शिक्षक तयार आहेत, मात्र त्यास दोन वर्षे मुदतवाढ द्यावी. राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी मनोगतात वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी आदेश रद्द करावा, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षकांच्या वेतन फरक असू नये आदी मागण्या केल्या. जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी वरुटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सरचिटणीस केशवराव जाधव यांनी आभार मानले. यावेळी मोहन भोसले, माधवराव पाटील, शिवाजी पाटील, अरुण पाटील, नामदेव रेपे उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Governance, positive,  teachers, questions