Tue, Feb 18, 2020 06:30होमपेज › Kolhapur › पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रीगणेशाला निरोप 

पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रीगणेशाला निरोप 

Published On: Sep 12 2019 10:13PM | Last Updated: Sep 13 2019 11:58AM
कसबा बावडा : प्रतिनिधी

महापुराच्या पार्श्वभूमीवरती कसबा बावडा परिसरातील मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी अनंत चतुदर्शीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात कसबा बावड्यात श्रीगणेशाला निरोप देण्यात आला. उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत राजाराम बंधारा येथे तीस गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. यापैकी तीन मूर्ती विसर्जित तर २७ मूर्तींचे दान करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दान केलेल्या मूर्ती व निर्माल्य घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट, शिवसेना विभागीय कार्यालय यांच्यावतीने मंडळांच्या अध्यक्षांना मानाचे श्रीफळ पानविडा देऊन फेटा बांधण्यात आला. सलग १२ व्या वर्षी आमदार सतेज पाटील यांच्या वतीने दत्त मंदिर परिसरात मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी खिचडी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

गुरुवारी अनंत चतुदर्शी असल्याने काही घरगुती तर सार्वजनीक मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी सकाळपासून राजाराम बंधार्याजवळच्या घाटावर गणेशभक्तांची वर्दळ सुरु होती. सकाळी अचानक ग्रुपच्या गणपतीचे पहिल्यांदा विसर्जन झाले. यानंतर दिवसभर विसर्जनासाठी मंडळांचे कार्यकर्ते येत राहिले. 

सायंकाळी सहानंतर मुख्य मार्गावर गणेश विसर्जनासाठी मंडळे सलग येत राहिली. डॉल्बीला फाटा देत अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला. ढोल, ताशे, हालगी, घुमक्याचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि चिरमुर्यांची उधळण करत बाप्पांचा अखंड जयघोष सुरु होता. भगवे, गुलाबी फेटे बांधून महिलांचा विसर्जन मिरवणुकीत सक्रिय सहभाग राहिला.