Mon, Jun 17, 2019 18:34होमपेज › Kolhapur › आगामी हंगामात पुन्हा बंपर साखर उत्पादन!

आगामी हंगामात पुन्हा बंपर साखर उत्पादन!

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 11:56PMकुडित्रे  : प्रा.एम. टी. शेलार 

चालू हंगामात देशात सर्वसाधारण पाऊसमान झाल्यामुळे आगामी 2018-19 च्या गळीत हंगामात  चालू हंगामापेक्षा 28 ते 33 लाख मे.टनांनी साखर उत्पादन वाढणार आहे. परिणामी आगामी हंगामात परत एकदा साखर उत्पादनाचा उच्चांक होऊन देशात 350 ते 355 लाख मे.टन साखर उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज इंडियन शुगर मिल्स असो.ने (इस्मा) व्यक्त केला आहे.

 ‘इस्मा’ च्या अंदाजानुसार येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या 2018-19 च्या हंगामासाठी देशात 54.35 लाख हेक्टर्स क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या प्रमुख राज्यात उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

 उत्तर प्रदेश पुन्हा नंबर वन !
उत्तर प्रदेश या सर्वाधिक उसाचे क्षेत्र असणार्‍या राज्यात 23.40 लाख हेक्टर्स क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात (चालू) 23.30 लाख हेक्टर्सवर ऊस होता. को-0238 या  हाय यील्डिंग व्हरायटीने ऊस उत्पादनात व साखर उत्पादनात वाढ होईल असा इस्माचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात गेल्या (चालू) हंगामात झालेल्या 120.50 लाख मे.टन साखर उत्पादनात वाढ होऊन ते 130 ते 135 लाख मे. टन इतके होईल, असा अंदाज आहे.

कर्नाटक व तामिळनाडूतही वाढ  
जून ते सप्टेंबर 2017 या काळात कर्नाटकात चांगला पाऊस झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे सुमारे 5.02 लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. गेल्या हंगामात 4.15 लाख हेक्टर्सवर ऊस होता. त्यामुळे संपलेल्या हंगामात झालेल्या 36.54 लाख मे.टन साखर उत्पादनात वाढ होऊन 44.80 लाख मे.टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

तामिळनाडूमध्येसुद्धा उसाखालील क्षेत्रात वाढ होऊन ते 2.60 लाख हेक्टर्स (संपलेल्या हंगामात 2.01 हेक्टर्स) झाले आहे. राज्यात साखर उत्पादन तब्बल 3 लाख टनांनी वाढून ते 9 लाख मे.टन होईल, असा ‘इस्मा’चा होरा आहे.

30 जूनपर्यंत 321.95 लाख टन साखर उत्पादन
देशातील साखर हंगाम (शुगर इअर) ऑक्टोबर ते सप्टेंबर असा आहे. चालू 2017-18 च्या हंगामात 30 जूनपर्यंत 321.95 लाख मे.टन साखर उत्पादन झाले आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत तामिळनाडू आणि कर्नाटकमधील 50 ते 60 हजार मे.टन साखर उत्पादनाची भर पडून 322.5 लाख मे.टन साखर उत्पादन होईल.

महाराष्ट्र  दुसर्‍या क्रमांकावर
महाराष्ट्रात उसाखालील क्षेत्रात पुढील हंगामासाठी सुमारे 25 टक्के वाढ झाली आहे. संपलेल्या हंगामात उसाखाली 9.15 लाख हेक्टर्स क्षेत्र होते. पुढील हंगामासाठी 11.42 लाख हेक्टर्सवर ऊस आहे. संपलेल्या हंगामात राज्यात 107.15 लाख मे.टन साखर उत्पादन झाले. आगामी हंगामात महाराष्ट्रात 110 ते 115 लाख मे.टन साखर उत्पादन होईल, असा ‘इस्मा’चा अंदाज आहे.