Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात अभूतपूर्व बंद

कोल्हापुरात अभूतपूर्व बंद

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 09 2018 11:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘जय शिवाजी...जय भवानी, एक मराठा... लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं...’ अशा हजारो आंदोलकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासून हजारो लोकांचे जथ्थे भगवे झेंडे, टी-शर्ट, टोप्या घालून दसरा चौकाकडे येत होते. ग्रामीण भागातून, उपनगरांतील तरुण मोटारसायकल रॅलीने शहरात आले. शहरात व उपनगरांत यानिमित्ताने भगवे वादळ निर्माण झाले होते.

मध्यवर्ती बसस्थानक, महाद्वार रोड, उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी आदी बाजारपेठांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट पसरला होता. हजारो लोक रस्त्यावर येऊनही बंद शांततेत पार पडला. सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापुरात प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती.

जिल्ह्यासह शहरातील  सर्व बाजारपेठा, शाळा, कॉलेज, विविध संस्था, औद्योगिक वसाहतींनी बंद पाळून आंदोलाला पाठिंबा दिल्याचे फलक लावले होते. आज सकाळी आठ वाजल्यापासूनच बंदचे चित्र दिसून आले. कसबा बावडा, फुलेवाडी, साने गुरुजी आदी उपनगरांसह पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कळंबा आदी लगतच्या गावांतील तरुण मोठ्या प्रमाणात दसरा चौकातील आंदोलनाच्या मुख्य कार्यक्रमास सकाळपासून गटागटाने मोटारसायकलीने येऊ लागले. 

हातात भगवे झेंडे, ‘एक मराठा...लाख मराठा’ लिहिलेली डोक्यावर टोपी, गळ्यात स्कार्फ तसेच भगवा टी-शर्ट घातलेले हजारो तरुण-तरुणी, महिला, पुरुष सर्वच रस्त्यांवर असल्याने शहराला भगव्या वादळाचे रूप आले.  ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, एक मराठा लाख मराठा,’ अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. 
सकाळपासून दुपारपर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला. दसरा चौकातील  मुख्य कार्यक्रमानंतर  दुपारी आंदोलक परत निघताना सगळे रस्ते आंदोलकांनी व्यापले होते. मिरजकर तिकटी ते दसरा चौक, मध्यवर्ती बसस्थानक ते दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, शिवाजी पूल ते दसरा चौक, महावीर कॉलेज ते दसरा चौक अशी बघेल तिकडे गर्दीच गर्दी होती.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट :उद्यमनगरीही शांत

शहरातील लक्ष्मीपुरी धान्य ओळ, शाहूपुरी, राजारामपुरी, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड आदी   बाजारपेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट दिसत होता. व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सोमवार वगळता नेहमी यंत्रांची धडधड सुरू 
असणारी उद्यमनगरीही बंद होती. उद्यमनगरीच्या परिसरात आज शांतता होती. 

प्रवेश मार्ग आंदोलकांनी फुलले

शाहू नाका, शिंगणापूर नाका, कसबा बावडा शुगर मिल चौक, कळंबा नाका, वडणगे फाटा आदी शहरातील प्रवेश करणार्‍या रस्त्यांवरून सकाळपासून मोठ्या संख्येने आंदोलक शहराकडे येत होते. पोलिसांनी वाहने पार्किंगचे नियोजन यापूर्वी जाहीर केल्याने आंदोलकांना संबंधित ठिकाणी वाहने लावण्याचे सांगितले जात होते. या चौकांमध्ये हजारो आंदोलकांची वर्दळ सायंकाळपर्यंत दिसून आली. त्यामुळे शहरात प्रवेश करणारे रस्ते आंदोलकांनी फुलल्याचे चित्र होते.  

प्रत्येक चौकात पोलिस फौजफाटा

शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सर्व रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तासाठी होते. प्रत्येक गोष्टीची अपडेट पोलिस सातत्याने बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून घेत होते. 

मिरवणुकीने आंदोलनात सहभाग

राजारामपुरीसह  उपनगरातील आंदोलकांनी हालगी-घुमक्यासह जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देत मिरवणुक काढून आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसून आले. 

ग्रंथालये बंद; अत्यावश्यक सेवा सुरु

करवीर नगर वाचन मंदीरसह सर्वच ग्रंथालयांनी बंद पाळला होता.  औषध दुकाने, दवाखाने, लॅब्रोटरी, अ‍ॅम्बुलन्स सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु होत्या. 

उपनगरात अभूतपूर्व बंद

कोणाताही बंद असो, त्याचा परिणाम शहराच्या प्रमुख भागातच दिसतो हा समज गुरूवारी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदने दूर केला. शहराच नव्हे तर उपनगरात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. उर्त्स्फुतपणे सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा आरक्षणासाठी अवघ्या ‘सकल जना’ने पाठिंबा व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी शहरातील सर्वच उपनगरात सकाळपासूच बंद पाळण्यात आल्याने हा बंद ङ्गन भूतो, न भविष्यतीफ असाच ठरला. कोणत्याही पक्षाचा बंद असो, कोणत्याही कारणांसाठी असो, त्याचा उपनगरावर कधीच परिणाम जाणवत नाही. ङ्गबंदफ काळात शहरातील महाद्वार रोड, गुजरी, शिवाजी रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, राजारामपुरी मुख्य रस्ता, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व्यापारी पेठ, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक इतक्याच परिसरात बंद दिसून येतो. शहराच्या उपनगरातील व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सुरूच असतात. दरवेळी बंद काळात दिसणारे हे चित्र आजमात्र, कोणत्याच उपनगरात दिसले नाही.

सर्व व्यवहार ठप्प

आवाहन करत फिरणारे कार्यकर्ते नाही, कोठेही तोडफोड नाही तरीही उपनगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी दुध विक्री केंद्रांचा काही ठिकाणचा अपवाद वगळता एकही दुकान आज उघडले नाही. दुध विक्रीसाठी जी दुकाने पहाटे उघडली ती सकाळी सात-आठ वाजेपर्यंतच बंदही झाली. केश कर्तनालय, लाँड्री, दुचाकी दुरूस्ती, किराणा, बेकर्स आदी दुकानाचे तर शटर आज वर सरकरलेच नाही. यामुळे उपनगरातील रस्तेही आज सकाळपासूनच ओस पडले होते. रस्त्यावर केवळ चालत ये-जा करणारे नागरिक, दुचाकी आणि अधूनमधून धावणार्‍या चारचाकी असेच चित्र उपनगरात दिसत होते.

उपनगरातील खासगी क्‍लासेस, अंगणवाड्या बंदच राहिल्या. एरव्ही बंद काळात मैदानावर रंगणारे खेळ, तरूण मंडळे, मंदिर आदी ठिकाणी गटागटाने चर्चा करणारे तरूण, नागरिक असे दिसणारे चित्र आजच्या बंदच्या दरम्यान बहुतांशी उपनगरात कोठे दिसले नाहीत. नागरिक, तरूण-तरूणींनी उर्त्स्फुतपणे बंदला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत होते. बंद काळात उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असते. आज मात्र, उपनगरातील रिक्षा, टेम्पों आदी वाहने रस्त्यावर आलीच नाहीत. उपनगरात सुरू असलेल्या बांधकामांची कामेही अनेक ठिकाणी ठप्पच होती. 

उपनगरातील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आदीपासून ते अगदी कामगार, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आबालवृध्द हातात भगवे ध्वज घेऊन, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून दसरा चौकाकडे जात होते. यामुळे उपनगरातून दसरा चौकाकडे जाणार्‍या या जथ्यांनी शहराभोवतालचा परिसर सकाळी भगवा झाल्याचेच चित्र निर्माण झाले होते.

शासकीय कार्यालय,  शाळा-महाविद्यालय परिसरात शुकशुकाट

कोल्हापूर बंदमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये,  शाळा-महाविद्यालये परिसरात शुकशुकाट होता.  मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आज न्यायालय आवारात शुकशुकाट पहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. कोल्हापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शहरातील सर्व शाळा देखील बंद होत्या. राज्य सरकारी-निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा सपं व कोल्हापूर बंदमुळे विद्यार्थांना सलग तीन दिवस सुट्टयांचा आनंद घेता आला. 

शिवाजी महाराज, मावळ्यांच्या वेशभूषेत आंदोलक 

भगव्या साड्या, फेटे परिधान केलेल्या महिलांचा सहभागही लक्षणीय होता. देवल क्‍लब रोडवरील तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते व बालकांनी रस्त्यावर ठ्यिा मारुन घोषणाबाजी केली. कार्यकर्त्याना सेभत सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरासह ग्रामीण भागातून सभेसाठी आलेल्या तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. शिवाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले. 

एस.टी., के.एम.टी.सहसर्व प्रवासी वाहतूक यंत्रणा ठप्प 

महाराष्ट्र व कोल्हापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर एस. टी.,के.एम.टी, रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस व वडाप वाहतूक पूर्णपणे बंद होती. जिल्ह्यात सर्वत्र ही परिस्थिती होती. यामुळे एसटी जिल्ह्यातील आगारातून दिवसभरात एकही बस सुटली नाही.  दिवसभरात सुमारे 3500 हजार फेर्‍या रद् करण्यात आल्या. तर केएमटीने प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. एसटी आणि रिक्षा बंदमुळे परगावाहून आलेल्या प्रवाशांना मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात अडकून पडावे लागले. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु होती. पण रेल्वेने आलेल्या प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती, त्यामुळे त्यांनाही बराच वेळ थांबून रहावे लागले. 

आंदोलनाची गंभीर घेऊन पोलिस प्रशासनाशी एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून एसटीची बस सेवा बंद केली होती. तसेच मुक्‍कामाला बस घेऊन जाणार्‍या चालकांना प्रवासी सोडून परत येण्याची सूचना वाहक चालकांना दिली होत्या, त्यामुळे रात्रीपासून त्या बसेस आगारात जमा करण्यात आल्या होत्या. यामुळे रात्रीपासून मध्यवर्ती 

मध्यवर्ती बस स्थानकाचे गेट बंद

बसचे होणार नुकसान टाळण्यासाठी एसटीच्यावतीने मध्यवर्ती बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारांना गेट लावून आत जाण्यास मज्जाव केला जात होता.  रिक्षा, वडाप रिक्षा बंद होती. त्यामुळे प्रवासी व पर्यटकांची चांगलीच तारंबळा उडत होती. लांब गावाहून आलेले पर्यटक हातात पिशव्या व इतर साहित्य घेऊन चालत जातांना दिसत होतेे.  बंदच्या पार्श्‍वभूमीवर खाजगी बस कंपन्यांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून खाजगी बस सेवा बंद होती. रिक्षा संघटनांच्यावतीने सकल मराठा क्रांती मोर्चाला अगोदरच पाठिंबा दिल्यामुळे रिक्षा चालकांना व्यवसाय बंद ठेवून सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते.

पारंपरिक वाद्यांचा गजर

सकाळी नऊनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लोक ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टरट्रॉली, जीप अशा विविध वाहनांतून शहराकडे येत होते. शहरात प्रवेश करणार्‍या सर्व चौकांत अशी वाहने अडवून त्यांना नियोजित पार्किंगच्या ठिकाणी लावण्याची विनंती पोलिस करताना दिसून आले. वाहने पार्किंगच्या ठिकाणी लावून आंदोलक चालत दसरा चौकातील मुख्य कार्यक्रमाकडे येत होते. यातील अनेक आंदोलकांनी मावळ्यांची वेशभूषा केली होती. काहींनी भजन म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत आंदोलनात सहभाग घेतला.