होमपेज › Kolhapur › शहरी भागात पुन्हा ‘गुड मार्निंग पथके 

शहरी भागात पुन्हा ‘गुड मार्निंग पथके 

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:15AMकोल्हापूर: अनिल देशमुख

राज्यातील शहरी भागात पुन्हा ‘गुड मार्निंग पथके’ कार्यान्वित होणार आहेत. राज्य शासनाने ‘हागणदारी मुक्त’ शहरांचा दर्जा कायम राहवा याकरिता हा निर्णय घेतला आहे. जूनपासून तीन महिने या पथकाद्वारे ‘ओडी वॉच’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील नागरी भाग 1 आक्टोबर 2017 रोजी हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, अनेक ठिकाणी ‘हागणदारी मुक्त’ घोषणेचा फज्जा उडल्याचे चित्र आहे. यामुळे या उपक्रमाच्या मूळ उद्देश पूर्णपणे सफल होताना दिसत नाही. यामुळे राज्य शासनाने ‘हागणदारी मुक्ती’साठी पुन्हा ‘ओडी वॉच’ कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

वैयक्तिक घरगुती शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे आणि ज्यांची कामे अपूर्ण आहेत, त्या शौचालयांची बांधकामे येत्या दि.30 मेपर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. बांधकाम झाल्यानंतर त्याची छायाचित्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर सादर करावी लागणार आहेत. याच कालावधीत संबंधित लाभार्थ्यांचे आधार कार्डही या योजनेसाठी लिंक करावे लागणार आहे.

सार्वजनिक, सामुदायिक शौचालयाच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या शौचालयात वीज, पाणी, दरवाजे आदी बाबत खबरदारी घ्यावी, तसेच वेळोवेळी ‘व्हॅक्युम एम्टीअर यंत्रणे’द्वारे मैला उपसा करून त्यावर सीटीपी प्लँटमध्ये प्रक्रिया करावी, ज्या ठिकाणी सीटीपी प्लँट नसेल तिथे प्रक्रियेसाठी मार्गदर्शन घ्यावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यातील शहरे ‘हागणदारी मुक्त’ करताना त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते, त्या अनुदानाचा वापर केवळ हागणदारी मुक्त उपक्रमासाठीच करावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही राज्य शासनाने दिला आहे.