Tue, Apr 23, 2019 01:55होमपेज › Kolhapur › साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:20AMकोल्हापूर : निवास चौगले

केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत घेतलेल्या निर्णयाने साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का नाही, याची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या दोन समित्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. साखरेचे भाव स्थिर राहण्याबरोबरच साखर निर्यात, कारखान्यांवरील साखर निर्बंध यावर चांगला परिणाम झाल्याचे मत या समितीने नोंदवले आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी संपलेल्या हंगामात अंदाजापेक्षा जास्त साखर उत्पादन झाले. पण, साखरेचे दर गडगडले आणि मागणीही ठप्प झाल्याने उद्योगासमोर मोठी अर्थिक अडचण निर्माण झाली होती. ठरलेली एफआरपी तर नाहीच पण बहुंताश साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले. त्यातून हा उद्योगच अडचणीत आला होता. संपूर्ण देशभर या उद्योगाला विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली. 

यावर मार्ग काढण्यासाठी केंद्राने पहिल्यांदा साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल 2900 रुपये निश्‍चित केला.  त्यानंतर 20 लाख टन साखर निर्यात सक्‍तीची केली. अलीकडे कारखानानिहाय साखर विक्रीचा कोटाही निश्‍चित केला. जेणेकरून मागणीपेक्षा जास्त साखर बाजारात येऊन दर पडू नये. अलीकडेच देशात 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय झाला. या सर्व निर्णयांचे स्वागत उद्योगाकडून झाले. त्यातून शेतकरी व उद्योगालाही दिलासा मिळाला. बहुंताश कारखाने या निर्णयाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर पडले. 

या निर्णयांची कारखाना पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होते का नाही, याची तपासणी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभाग व अन्य एका विभागाचे प्रत्येकी दोन अधिकारी समितीत होते. या समितीतील सदस्यांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व पंजाब राज्यातील 18 कारखान्यांची तपासणी केली. त्यात कारखान्यांचे सहकार्य व राज्य शासनाच्या मदतीने या उद्योगाला ‘अच्छे दिन’ आल्याचे आढळून आले. साखरेचे दर स्थिर राहण्याबरोबर शेतकर्‍यांची थकीत एफआरपी देण्यास या निर्णयांचा चांगला फायदा झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला आहे.