Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Kolhapur › 32 लाखांचे सोने हडप; जिल्हा बँकेची फिर्याद; गुन्हा दाखल

32 लाखांचे सोने हडप; जिल्हा बँकेची फिर्याद; गुन्हा दाखल

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतून तारण ठेवलेल्या 32 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर  डल्ला मारल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शाखाधिकार्‍यासह कॅशिअर व बँकेचा सोनार अशा तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी बँकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगाेंंडा पाटील यांनी फिर्याद दिली. 

शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (रा. शिये, ता. करवीर), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (रा. कसबा बावडा) व सोनार सन्मुख आनंदराव ढेरे (रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांनी सोने तारणच्या 27  प्रकरणांतील खरे सोने काढून त्या जागी बनावट सोने ठेवल्याचा संशय फिर्यादीत व्यक्‍त करण्यात आला. सुमारे 32 लाख रुपयांचे खरे सोने हडप झाले असून, चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी वनिता रंगराव मोरे (रा. शिये, ता. करवीर) आल्या होत्या. त्यांनी सोने तारणावर 99 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची रक्‍कम भरल्यानंतर सोन्याची मागणी केली. त्यांचे सोने ठेवलेली सीलबंद पिशवी उघडली असता त्यांनी हे सोने आपले नसल्याचे सांगितले. खात्री केल्यानंतर पिशवीतील सोने बनावट निघाले. याबाबत शाखाधिकारी पाटील यांनी 1 जून रोजी सराफ ढेरेविरोधात बँकेकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर बँकेच्या पथकाने या शाखेकडे सोने तारण असलेल्या 199 प्रकरणांची चौकशी केली. बँकेच्या पॅनेलवरील दुसरे सराफ बाजीराव जांभळे यांनी यातील सोन्याची तपासणी केली. त्यात 32 प्रकरणांतील सोने बनावट असल्याचे पुढे आले. त्यानंतर या 32 कर्जदारांना नोटिसा पाठवून बँकेत बोलावण्यात आले. 29 कर्जदार हजर राहिले, त्यांच्या समक्ष तारण सोन्याची पडताळणी केली दोन कर्जदारांनी आपले सोने खरे असल्याचे सांगितले. मात्र, 27 कर्जदारांनी आपले सोने बनावट असल्याचे सांगितले. तशी हरकत पत्रे संबंधितांकडून घेतली. त्यानंतर संबंधितांच्या सह्या घेऊन हे सोने लॉकरमध्ये ठेवण्यात आले. त्याचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. 

बँकेच्या सोमवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज शाखाधिकारी पाटील, कॅशिअर नाईक व सराफ ढेरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी 32 लाख रुपये सोन्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसून, अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे करत आहेत.

सर्व सह्या बोगस

ज्या 29 प्रकरणांतील सोने बनावट आढळले आहे, ते ठेवलेल्या पिशवीवरील सराफासह शाखाधिकारी, कॅशिअर यांच्या सह्या बोगस असल्याचेही बँकेने केलेल्या तपासणीत आढळून आले. यात बँकेच्या आणखी काही कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सराफाचा अटकपूर्व जामीन

याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच सराफ सन्मुख ढेरे याने आज अटकपूर्व जामीन घेतल्याची चर्चा पोलिस ठाण्यामध्ये होती. बँकेच्या अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला.