होमपेज › Kolhapur › सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारे दाम्पत्य अटकेत

सोने खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारे दाम्पत्य अटकेत

Published On: Jun 23 2018 1:57AM | Last Updated: Jun 23 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सराफ पेढीत सोने खरेदीच्या बहाण्याने जावून दागिने चोरणार्‍या महिलेेसह तिच्या पतीला अटक करण्यात आली. सुनीता संजय साबळे (वय 42), संजय धोंंडीराम साबळे (45, रा. शिंदेे मळा, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिलेने चार गुन्ह्यांची कबुली दिली असून तिच्याकडून 5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कामगिरी केली. 

सुनीता साबळे ही सराफ दुकानात जाऊन काही दागिने दाखविण्याची मागणी करीत असे. सराफाचे लक्ष विचलित करून समोर ठेेेवलेल्या ऐवजांपैकी एखादा दागिना हातचलाखीने चोरत असेे. मागील दोन महिन्यांत गुजरीसह शहरातील काही सराफ पेढीवर असेेे प्रकार घडलेे होते. गुजरीतील दोन सराफ पेढ्या, बालिंगा येथील ज्वेलर्स दुकानातून संशयित महिलेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी तपासाचे आदेश दिले होते. 

संशयित महिला सांगलीतील अभिनंदन कॉलनीत राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सुनीता साबळे हिला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरटी महिला तीच असल्याची खात्री झाल्याने तिला अटक केली.

चार गुन्हे उघड

बालिंगा येथील ओम ज्वेलर्स दुकानातून 14 जूनला तिने मंगळसूत्र चोरले होते. 18 मे 2018 ला गुजरीतील बी. डी. केे. ज्वेलर्स दुकानातून दीड ग्रॅमच्या सोन्याच्या वाट्या, तीन ग्रॅॅमचे टॉप्स तर 22 मेे रोजी शिवाजी पेठेतील महालक्ष्मी ज्वेेलर्समधून कानातील टॉप्स, सोन्याच्या दोन वाट्या, 4 मणी चोरुन नेले होते. उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप, सचिन पंडित, शिवाजी खोराटे, श्रीकांत मोहिते, राम कोळी यांनी ही कारवाई केली. 

मोटारीतून रुबाब

सुनीता साबळे सोने खरेदी करण्यास मोटारीतून येत होती. मोटारीत तिचा पती संजय चालक म्हणून थांबून असायचा. सराफाशी बोलतानाही ती अत्यंत रुबाबात वावरत असे. आपण मोटारीतून फिरतो, तो माझा चालक आहे असे भासवून तिने अनेकांची दिशाभूल केली होती.