कोल्हापूर : सदानंद पाटील
गोकुळ दूध संघाकडून जिल्ह्यातील सर्व गावांमधून जी राजकीय, पदाधिकारी, बचत गट, सहकारी संस्था आदींची माहिती संकलित करण्यात येत आहे. ती संशयाच्या भोवर्यात अडकली आहे. ही माहिती एनडीडीबीच्या सूचनेनुसार संकलित केल्याचे सांगण्यात येत असले तरी वरीलप्रमाणे माहिती संकलित करावी, याबाबतचे कोणतेही लेखी आदेश नाहीत.त्यामुळे ही माहिती गोकुळ कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी संकलित केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोकुळ दूध संघ त्यांच्या कारभारावरून चर्चेत आला आहे. दूध दराची कपात, वार्षिक सर्वसाधारण सभा, खोटे प्रोसिडिंग लिहिल्याचा आरोप, म्हशीच्या दुधात गायीचे दूध मिसळणे, टँकर लॉबी यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच मोर्चे-प्रतिमोर्चे, आव्हान-प्रतिआव्हान देण्यात येत आहे. हा सर्व वाद कमी होता की काय म्हणून आता माहिती संकलनाचा नवीनच मुद्दा पुढे आला आहे. एनडीडीबीने पुढील नियोजनासाठी विविध माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्याचे संघाकडून सांगण्यात येत आहे.
एनडीडीबीच्या सूचनेनुसार गावातील सर्व राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते, सर्व शेतकरी संघटना, विकास, पाणीपुरवठा, दूध संघ, पतसंस्था, सहकारी बँकेचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षण संस्था व त्यांचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक, वारकरी संप्रदाय, पुजारी, गावातील वक्ते, तरुण मंडळे व त्यांचे पदाधिकारी, महिला बचत गट व त्यांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्याबाबतची माहिती गोकुळ संकलित करत आहे. मात्र, हे माहिती संकलनच आता वादाच्या भोवर्यात सापडले आहे.
एनडीडीबीला या माहितीची गरज काय?
एनडीडीबी दूध उद्योगाशी संबंधित शिखर संस्था आहे. त्यांच्याकडून पशुधन, वित्तीय संस्था, सहकारी संस्थांची माहिती घेणे समजण्यासारखे आहे. मात्र, राजकीय पक्ष, शेतकर्यांच्या विविध संघटना, गावातील वक्ते, पुजारी, वारकरी संप्रदाय या माहितीची गरज काय, असा प्रश्न निर्माण निर्माण होत आहे. याप्रश्नी एनडीडीबीला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
माहिती मागितली, पण पत्र नाही
‘गोकुळ’कडून सुरू असलेल्या माहिती संकलनाबाबत चेअरमन विश्वास पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ही माहिती एनडीडीबीने मागितली आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबतचे लेखी पत्र अजूनही आलेले नाही. हे पत्र मागवण्यात आले आहे. लेखी आदेश नसताना कोणाच्या आदेशाने व कोणासाठी हे संकलन सुरू आहे, असा प्रश्न आहे.