Sun, Jul 05, 2020 02:59होमपेज › Kolhapur › गोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा

गोकुळ’ला बदनाम करणार्‍यांविरोधात निषेध मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

देशातील व राज्यातील नावाजलेल्या गोकुळ दूध संघाची जिल्ह्यातील काही लोकांकडून बदनामी सुरू आहे. अशा लोकांचा निषेध करण्यासाठी येत्या 7 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक, ‘गोकुळ’चे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शासनानेही दूध खरेदीसाठी 5 रुपये अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येईल, असे सांगण्यात आले. हा मोर्चा 7 डिसेंबरला दसरा चौकातून दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

खा. महाडिक म्हणाले, राज्यात सर्वात पहिल्यांदा ‘गोकुळ’ने दूध खरेदीचा दर वाढवला; मात्र त्याबद्दल कोणी कौतुक केले नाही. दर कमी केल्यानंतर मात्र टीका करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, देशांतर्गत अतिरिक्‍त दूध उत्पादन पाहता जादा दर देणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत असतानाही संघाची बदनामी करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 

चेअरमन पाटील म्हणाले, संघाच्या लाखो दूध उत्पादकांना संकटात टाकणार्‍या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात केवळ दूध उत्पादकच उपस्थित राहणार आहेत. ‘गोकुळ’वर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नसल्याने हा उद्योग सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 

अरुण डोंगळे यांनी टीका करणार्‍यांना वस्तुस्थिती समजून घ्यायची नाही. केवळ स्वार्थी हेतूने संघावर टीका होत असल्याचे सांगितले. गोकुळ संघात झालेल्या या पत्रकार परिषदेस सर्व संचालक, दूध उत्पादक महिला, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नेत्यांनी दुधात राजकारण आणू नये 

इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, अतिरिक्‍त दुधासह पावडर आणि बटरचा जगातच प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्याच नव्हे तर इतरही जिल्ह्यांतील दूध संघांतही दराबाबतचा वाद सुरू आहे. यात राजकारण घुसल्याने हा वाद चिघळत आहे. म्हणूनच नेते मंडळींनी कृपा करून राजकारण आणू नये.

दरवेळी काय ऐकायचं?

गोकुळमधील हा वाद सर्वसाधारण सभा गुंडाळल्यामुळे लागल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संचालक रवींद्र आपटे चांगलेच भडकले. मागील सभेतही सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. असे असताना वारंवार तेच प्रश्‍न विचारले तर उत्तर द्यायची काही गरज नाही, असे त्यांनी सांगितले. अरुण नरके यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र आपटे यांनी त्यांना दरवेळी हे काही ऐकायची गरज नसल्याचे सांगितल्याने नरकेही शांत बसले.