Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ची गायीच्या दुधाच्या खरेदी दरात 2 रु. कपात

‘गोकुळ’ची गायीच्या दुधाच्या खरेदी दरात कपात

Published On: Jun 20 2018 10:17AM | Last Updated: Jun 20 2018 10:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गायीचे दूध खरेदी दर शासनाने एका आदेशाद्वारे निश्‍चित करूनही हा आदेश धाब्यावर बसवून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने मंगळवारी गायीच्या दूध खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 21 जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने 6 जून 2018 रोजी एका आदेशान्वये गायीच्या 3.2 टक्के फॅट व 8.3 एसएनएफ दुधासाठी प्रतिलिटर 26.10 रुपये, तर 4.5 टसाठी प्रतिलिटर 30 रुपये निश्‍चित केला आहे. शासनाने निश्‍चित केलेला हा दर उत्पादकांना देणे बंधनकारक आहे. तरीही ‘गोकुळ’ कडून कार्यक्षेत्रातील गायीचे दूध प्रतिलिटर 25 रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध प्रतिलिटर 20 रुपये दराने खरेदी केले जात होते. मुळातच शासनाचा आदेश धाब्यावर बसवलेला असताना आज पुन्हा खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय संघाने घेतला.

संघाकडे सध्या दररोज गायीचे पाच लाख 50 हजार लिटर दूध संकलित होते. यापैकी 2 लाख 20 हजार लिटर दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची पावडर केली जाते; पण आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरचे दर कोसळल्याने संघाला तोटा होत असल्याचे कारण पुढे करून ही दर कपात करण्यात आली आहे. राज्यातील अन्य 16 संघांनीही गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची कपात केली; पण खरेदी दरात कोणतीही कपात केलेली नव्हती. ‘गोकुळ’ने मात्र प्रतिलिटर दोन रुपयांची कपात आज केली. त्यामुळे कार्यक्षेत्रातील गायीचे दूध प्रतिलिटर 23 रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध प्रतिलिटर 18 रुपये दराने खरेदी केले जाणार आहे. 

दूध विक्री दरात कपात झाल्यामुळे खरेदी दरातही तेवढीच कपात करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे निर्णय आज घेण्यात आला, असे गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले.