Fri, Apr 19, 2019 12:26होमपेज › Kolhapur › गोकुळच्या तीन लाख लिटर दुधाला अनुदान

गोकुळच्या तीन लाख लिटर दुधाला अनुदान

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:49AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

गायीचे पिशवी बंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी पाच रुपये अनुदान देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा दूध संघाला (गोकुळ) तीन लाख लिटर दुधाला हे अनुदान मिळणार आहे. मात्र, हे अनुदान घेणार्‍या संघांना यापूर्वी दूध पावडरसाठी झालेले अनुदान न देण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळलाही या अनुदानाला मुकावे लागणार आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून दूध रोको आंदोलन पुकारले होते. 

गायीचे दूध प्रति लिटर 25 रुपये दराने संघांनी खरेदी करण्याचा आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी 10 जुलै रोजी शासनाने निर्यात दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये तर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारच्या बैठकीत फक्‍त पिशवीबंद वगळून उर्वरित दुधाला पाच रुपये देण्याचा निर्णय झाला. हे पाच रुपये अनुदान घेणार्‍या संघांना पावडरचे अनुदानही मिळणार नाही. 

गोकुळचे गायीच्या दुधाचे रोजचे संकलन 5 लाख 50 हजार लिटर आहे. यापैकी 2 लाख 50 हजार लिटर दूध हे पिशवीतून मुंबई, पुणे येथे विकले जाते. उर्वरित 3 लाख लिटर दुधाला शासनाने  जाहीर केलेले अनुदान मिळणार आहे. दूध पावडरची मागणी घटल्याने अलिकडेच गोकुळने गायीच्या कार्यक्षेत्राबाहेरील दूध प्रति लिटर 18 रुपये दराने तर कार्यक्षेत्रातील दूध प्रति लिटर 20 रुपये दराने खरेदी करण्यास सुरुवात केली होती. 

चांगला निर्णय : विश्‍वास पाटील

या निर्णयाबाबत गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील म्हणाले, हा चांगला निर्णय झाला. आम्हीच गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळीही आम्ही या मागणीचा उल्लेख केला होता. आता शासनाने निर्णय घेतल्याने उत्पादकांना दर वाढवून देण्यात अडचण नाही.