Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Kolhapur › गोलरक्षक रणवीरने वाचवले अर्धा डझन गोल

गोलरक्षक रणवीरने वाचवले अर्धा डझन गोल

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:20PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

.चुरशीच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर 2-0 अशा गोलफरकाने मात करून साखळी फेरीत 6 गुणांसह आगेकूच केली. सामन्यात खंडोबा तालमीचा गोलरक्षक रणवीर खालकर याने तब्बल अर्धा डझन गोल सेव्ह करून संघाला मोठ्या पराभवापासून दूर ठेवले. ‘सामनावीर’ म्हणून पाटाकडीलच्या रणजित विचारे याला गौरविण्यात आले.

सॉकर अ‍ॅमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल महासंग्राम स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारी स्पर्धेतील साखळी सामना पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. बलाढ्य पाटाकडीलला खंडोबा तालीम मंडळाने विजयासाठी अक्षरश: झुंजविले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडीलने जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करत आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. अकिम ओला व ऋषिकेश मेथे-पाटील यांची संयुक्त चढाई गोलरक्षक रणवीर खालकरने फोल ठरविली. ऋषिकेशच्या पासवर अकिमचा फटका पोलला लागला. अकिम व ऋषिकेशची चढाई पुन्हा गोली रणवीरने फोल ठरविली. ऋषिकेशने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटकाही त्याने  बाहेर काढला. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 

उत्तरार्धातही पाटाकडीलचा आक्रमक पवित्रा कायम होता. ऋषिकेशची चढाई रणवीरने उत्कृष्टरित्या अपयशी ठरवली. ऋषिकेशचा दुसरा फटका त्याने झेलला. ऋषिकेशचा ग्राऊंडीग फटका रणवीरने पायाने रोखला. पाठोपाठ अकिमचा प्रयत्नही रणवीरने फोल ठरविला. 69 व्या मिनिटाला खंडोबाच्या गोलरक्षेत्रात उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवत अक्षय मेथे-पाटील याने डाव्या पायाच्या फटक्यावर उत्कृष्ट गोल नोंदवत आघाडी मिळविली. पाठोपाठ 70 व्या मिनिटाला रणजित विचारेने दुसरा गोल नोंदवत संघाची आघाडी 2-0 अशी भक्‍कम केली. खंडोबाकडून कपिल शिंदे यांने केलेल्या चार चढायांपैकी दोन स्ट्रोक गोलपोस्टला लागून बाहेर गेले. तर दोन अपयशी ठरले. साईराज दळवीचा प्रयत्न पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल नारायणपूरे याने अपयशी ठरविला. त्यांच्या विनायक पोवार, विक्रम शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला. एकाही गोलची परतफेड त्यांच्याकडून होऊ शकली नाही. 

‘शिवाजी’ची ‘पाटाकडील’वर मात...

17 वर्षांखालील गटात शिवाजी मंडळ संघाने पाटाकडील तालमीचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करून आगेकूच केली. संपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.