Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Kolhapur › अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या...जीव वाचवा

अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या...जीव वाचवा

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या...जीव वाचवा, अशा घोषणा देत रिक्षाचालकांनी बुधवारी जनजागृती मोहीम सुरू केली. यावेळी रिक्षांवर वाहतूक नियमांची माहिती दर्शविणारे स्टीकर  लावण्यात आले. मोहिमेचे नेतृत्व कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा इंदूलकर यांनी केले. 

दुपारी चारच्या सुमारास शिवाजी चौकात रिक्षाचालकांनी मोहिमेस सुरुवात केली. यावेळी वाहनधारकांना थांबवून त्यांना वाहतूक नियमांची माहिती देत वाहनांवर स्टीकर लावण्यात आले. यावेळी अ‍ॅम्ब्युलन्सबाबत प्रबोधन करण्यात आले. ही मोहीम शहराच्या मुख्य चौकांमध्ये सुरू राहणार असल्याचे इंदूलकर यांनी सांगितले. यामध्ये छत्रपती शिवाजी चौक रिक्षा मंडळाचे सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी पन्‍नासहून अधिक रिक्षाचालक सहभागी झाले. 

प्रबोधन फलकाचे अनावरण : जनजागृतीचा लघुपट दाखविणार

आधी अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या या उपक्रमाच्या अंतर्गंत  शुक्रवारपासून (दि.17) वाहतूक नियम प्रबोधन अभियानाचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थित केला जाणार आहे. सकाळी  9.15 वाजता हॉकी स्टेडियम  चौकातून अभियानास सुरुवात होणार आहे. यावेळी वाहतूक नियम प्रबोधन फलकाचे अनावरण तसेच डोन्ट हा  जनजागृतीपर लघुपट दाखविला जाणार आहे. हॉकी स्टेडियम सिग्‍नल, सावित्रीबाई फुले दवाखाना चौक, गोखले कॉलेज चौक,  उमा टॉकीज चौैक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर आदी परिसरात हे अभियान सुरू असणार आहे. 

सलग तीन दिवस हे अभियान शहरातील विविध ठिकाणी केले जाणार आहे. हे अभियान   केवायफोरएच या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने आयोजित केले असून वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे सागर बगाडे यांनी केले आहे.