Mon, Jun 24, 2019 20:55होमपेज › Kolhapur › जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देणार

जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देणार

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 28 2018 11:35PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सामाजिक, पुरोगामी आणि सहिष्णुतेची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सेवेची संधी मिळणे ही फार मोठी जबाबदारी आहे. शांतता-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत असताना, जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरला नियुक्ती होण्यापूर्वी देशमुख यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. देशमुख मूळचे लातूर येथील आहेत. 2009 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. 2010 मध्ये ठाणे प्रशिक्षणार्थी, 2012 साकोली येथे अप्पर अधीक्षक, 2013 पुणे येथे एसआरपी कमांडंट, 2014 सातारा, 2016 गडचिरोली 

पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. देशमुख म्हणाले, जिल्ह्याला राजर्षी शाहूंच्या विचारांची परंपरा आहे. पोलिस दलातील सेवेत एवढ्या लवकर जिल्ह्यात आव्हानात्मक कामाची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. या संधीचे सोने करून दाखवीन. सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, यावर कटाक्ष राहील. अधिकार्‍यांसह पोलिसांना विश्‍वासात घेऊन कार्यरत असताना त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य असेल. पोलिस कल्याण योजनेतून कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांसाठी विधायक योजना राबविण्याचा प्रयत्न असेल.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील वाहतूक  यंत्रणेत सुलभता निर्माण करण्यासाठी निश्‍चित नियोजन होईल, असे स्पष्ट करून देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येईल. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या समाजकंटकांची गय करणार नाही. काळे धंदे, तस्करी टोळ्यांना थारा नाही. समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या गुन्हेगारांवर ‘मोकां’तर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी वर्षभरात गुन्हेगारीला रोखण्यासाठी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने संघटित टोळ्यांविरुद्ध सातत्य ठेवण्याचा प्रयत्न राहील. दि. 2 ऑगस्टला पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारणार आहोत, असे ते म्हणाले.