होमपेज › Kolhapur › जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या

जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर: प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जिल्ह्यासाठी भरीव निधी द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी केली. ‘टेक्स्टाईल पार्क’बाबतही आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज दुपारी विमानतळावर आगमन झाले. दुपारी 4.20 वाजता ते संभाजीनगर, जुनी मोरे कॉलनी येथील ना. पाटील यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ना. पाटील यांनी सपत्नीक फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी सौ. महाडिक यांनी जिल्ह्यासाठी विकास निधी द्या, अशी मागणी केली. 

आ.हाळवणकर यांनी टेक्स्टाईल पार्कबाबत चर्चा केली. सुमारे पंधरा मिनिटांच्या भेटीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. अमल महाडिक, महापौर सौ. हसिना फरास, समरजितसिंह घाटगे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, संदीप देसाई, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

अन् मुख्यमंत्री संतापले

ना. पाटील यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री वाहनात बसत होते. यावेळी मुख्यमंत्री वाहनात बसण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकाने त्यांच्या वाहनाचा दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री रक्षकावर संतापले. समोर लोक  थांबले आहेत, जरा बघा तरी मी बसलो की नाही ते, मी अजून बसायचा आहे. काय चालले हे अशा शब्दात त्यांनी रक्षकाला सुनावले. यानंतर उपस्थित लोकांची निवेदने स्वीकारत, त्यांना नमस्कार करत फडणवीस ताफ्यातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.