Wed, Jan 22, 2020 15:11होमपेज › Kolhapur › शेती पंपांसाठी २५० कोटी द्या

शेती पंपांसाठी २५० कोटी द्या

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर व सांगली सर्कलमधील शेतीपंपांसाठी 250 कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत केली. या मागणीसाठी आमदारांनी सभागृहाचे कामकाज रोखले. 

आठ महिन्यांत प्रलंबित जोडण्या दिल्या जातील, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली. 293 अन्वये शेती पंपांच्या वीज जोडणीसाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून आ. नरके यांच्यासह आमदार सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, अमल महाडिक यांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले.

विधानसभेत झालेल्या चर्चेवेळी आ. नरके  म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची 2014 पासून वीज जोडणीची कामे प्रलबिंत आहेत. जोडण्यासाठी पैसे भरूनदेखील पायाभूत आराखडा मंजूर नाही, शासनाने निधी उपलब्ध करून दिलेल्या नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. शेतकर्‍यांनी बोअर, विहीर, पाईप लाईन टाकणे, व मोटर खरेदी करणे इत्यादी कामे केली असून त्यांची आर्थिक गुंतवणूक झाली आहे. वीज जोडण्या नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

विदर्भ मराठवाड्यासाठी 2006-07 पर्यंतच्या वीज जोडण्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी रुपये 900 कोटी व सन 2013-14 पर्यंतच्या वीज जोडण्यासाठी पुन्हा रुपये 900 कोटी अशी एकूण 1800 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना 2013-14 पासून  वीज जोडण्या दिल्या जात नाहीत. जिल्ह्यातील वीज गळती कमी आहे व बिलाची वसुली जादा असल्याचे आमदारांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केळकर समितीच्या सूचनेप्रमाणे विदर्भ मराठवाड्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी निधी दिल्याचे सांगितले. यावेळी आमदारांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर वीज जोडणी न देऊन  अन्याय का करता ? असा सवाल करत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. यावर ऊर्जामंत्र्यांनी 1-4-2014 पासूनच्या  वीज जोडण्या मार्च 2018 अखेर, व उर्वरित वीज जोडण्या जून 2018 अखेर व एक वर्षाच्या प्रलंबित जोडण्या प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.