Thu, Jul 18, 2019 05:52होमपेज › Kolhapur › ‘बालकल्याण’मधील मुली बनणार स्वयंनिर्भय

‘बालकल्याण’मधील मुली बनणार स्वयंनिर्भय

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 10:42PMकोल्हापूर : प्रतिनिधी

तिच्या संरक्षणासाठी...तिच्या पंखांत बळ देण्यासाठी...तिचा आत्मविश्‍वास द्विगुणित करण्यासाठी दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फाऊंडेशन कटिबद्ध झाले आहे. मुलींना स्वयंनिर्भयतेने जगता यावे यासाठी त्यांना जुदो-कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यावेळी बालकल्याण संकुलातील सर्व मुला-मुलींसमोर स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच संकुलातील सर्व मुलींना पुढील दोन महिने ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण अंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे कबूल करीत स्वयंनिर्भय बनण्याचे बळ प्रयोग फाऊंडेशनने दिले आहे.

स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आलेल्या संकटांचा प्रतिकार कसा करायचा, प्रतिकार करताना कोणती काळजी घ्यायची, स्वत:च्या शरीराला इजा होऊ न देता प्रतिकार कसा करायचा, या सर्व बाबींचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांमार्फत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. संकुलातील केवळ मुलीच नाही, तर मुलांनीही प्रयोग फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा लाभ घेतला. अत्यंत कुतुहलाने सर्व मुलींनी प्रात्यक्षिके पाहिली. अनेक मुलींना हे सर्व नवे होते; पण याचे प्रशिक्षण आता आपल्यालाही दिले जाणार आहे, हे कळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यांवर आनंद आणि आत्मविश्‍वास झळकला. यावेळी बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, अधीक्षक पी. के. डवरी, अधीक्षक कांचन हेब्बाळकर, अधीक्षक नजिरा नदाफ, अधीक्षक द्रौपदी पाटील आदींची उपस्थिती होती. दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर कुराश असोसिएशनचे प्रशिक्षक शरद पोवार यांनी जुदो-कराटेचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी शीला खोत व कोल्हापूर कुराश असोसिएशनच्या शीतल रसाळ, रुद्वी शृंगारपुरे, प्रियांका पाटील, पार्थ पाटील, आकाश चिले आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. 

Tags  : Kolhapur, Girls, Balakalyan, become, self, reliant