Fri, Jul 19, 2019 18:47होमपेज › Kolhapur › दरोड्यातील ४० लाखांचे रक्‍तचंदन हस्तगत

दरोड्यातील ४० लाखांचे रक्‍तचंदन हस्तगत

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत वर्षापूर्वी झालेल्या दरोड्यातील फरारी चंदन तस्करांना बेड्या ठोकून स्थानिक गुन्हे अन्वेषणने चाळीस लाख रुपये किमतीचा अडीच टन रक्‍तचंदन साठा गुरुवारी हस्तगत केला. महंमद समीउल्ला अब्दुलरशिद शेख (वय 47), मोहम्मद रफिक समीउल्ला शेख (47, रा. शिमोगा, कर्नाटक) अशी या आंतरराज्य तस्करांची नावे आहेत.

जेरबंद तस्करांच्या चौकशीत महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह आंध्रातील चंदन तस्करीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत व पथकाने मौजे कार्वे (ता. चंदगड) येथे छापा टाकून कारवाई केली. टोळीकडून महाराष्ट्र, कर्नाटकातील आणखी काही चंदन तस्करांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. त्याचा ताबा घेण्यासाठी विशेष पथके कर्नाटक,आंध्रकडे रवाना झाली आहेत, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये महाराष्ट्र-कर्नाटकातील चंदन तस्कर टोळीने गतवर्षी 18 जुलै 2017 मध्ये दरोडा घातला होता. रोपवाटिकेतील कर्मचार्‍यांचे हातपाय बांधून, खोलीत कोंडून गोदामातील रक्‍तचंदन तेलाचे डबे, चंदनाची लाकडे, श्‍वेतचंदन असा सुमारे एक कोटीचा ऐवज लंपास केला होता. दरोड्याच्या घटनेनंतर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. वन विभागाच्या वरिष्ठाधिकार्‍यांनीही घटनेची दखल घेऊन टोळीचा तातडीने शोध लावण्याची मागणी पोलिस महासंचालकांकडे केली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आठ महिन्यांपूर्वी टोळीतील संदीप बाळू वसव (गणेशनगर, कराड), शिवा ऊर्फ शिनू चंदनवाले (रामोशीवाडा गावठाण, रोफळे बुद्रुक, ता. पंढरपूर), मच्छिंद्र विलास बनसोडे (गणेशनगर, रेठरे बुद्रुक, ता. कराड), संतोष सुग्रीव खुर्द (देगांव, पंढरपूर), इरफान अजिज बेग (शेशाद्रीपूरम, शिमोगा, कर्नाटक) या तस्करांना जेरबंद करून 61 लाख रुपये किमतीचा रक्‍तचंदन तेलासह मोठा साठा हस्तगत केला होता.

टोळीतील अन्य साथीदार फरारी असल्याने विशेष पथकामार्फत महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यात शोध जारी होता. संशयित महंमद समीउल्ला शेख, मोहम्मद शेख हे दरोड्यातील रक्‍तचंदन साठ्यासह तेलाच्या विक्रीसाठी चंदगड तालुक्यात वावरत असल्याची पथकाला माहिती मिळाली.

पथकाच्या सापळ्यात संशयित अलगद सापडले. त्यांच्याकडून 40 लाख रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप यांच्यासह पथकाने ही कारवाई केल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या कामगिरीबद्दल पथकाचा गौरव करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.