होमपेज › Kolhapur › ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ पॅटर्न राज्यभर जावा

‘मुख्यमंत्री दिलखुलास’ पॅटर्न राज्यभर जावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘मुख्यमंत्री दिलखुलास’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून वारणा पंचक्रोशीने जणू विधिमंडळाचे खुले अधिवेशन अनुभवले. या अधिवेशनात कोणताही राजकीय लवलेश नव्हता की, गटबाजीचे दर्शन नव्हते. तेथे होता तो केवळ सर्वसामान्यांचा मुख्यमंत्र्यांशी मुक्‍त संवाद. प्रत्येक घटकातील एक प्रतिनिधी प्रश्‍न विचारत होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास उत्तरे देत होते. शेती, सहकार, शेतकरी, कामगार, शिक्षक, महिला, विद्यार्थी अशा समाजाच्या सर्वच घटकांचे प्रश्‍न काय आहेत, त्याची उकल या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली.

माजी मंत्री विनय कोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना शक्यतो संसद अथवा विधिमंडळात खासदार आणि आमदारांच्या प्रश्‍नांना थेट उत्तरे द्यावी लागतात. वारणेच्या कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्र्यांच्याच मतानुसार हा उपक्रम राज्यातच नव्हे, तर देशात पहिला ठरावा. थेट जनतेशी संवाद साधने, त्यांच्या समस्या समजावून घेणे आणि त्यांच्या ऐनवेळी येणार्‍या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देणे हे एक आव्हान आहे. ते आव्हान आम्ही वारणेत पेलले. विनय कोरे यांनी मांडलेली ही संकल्पना प्रत्यक्षात जेव्हा मी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुभवली तेव्हा दोघेही भारावून गेलो. असे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाले, तर खर्‍या अर्थाने सरकार आणि सर्वसामान्य यांच्यातील तो दुवा ठरणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांचे कर्जापासून शेती उत्पन्‍न आणि त्यांचे दर याच्याशी अनेक प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आले. त्याचबरोबर विक्रांत पाटील यांनी नदीतील पाणी उपशासाठी होणार्‍या यातना आणि द्यावी लागणारी पाणीपट्टी शेतकर्‍यांना किती जाचक आहे, याचे चित्र मांडले. शेतीसाठी वीज वापरल्यानंतर सवलतीचा गाजावाजा करणार्‍या महावितरणकडून कशाप्रकारे शेतकर्‍यांची लूट सुरू आहे ही बाबही पुढे आली. जोतिबा (वाडी रत्नागिरी) च्या सरपंच रिया सांगळे यांनी मुंबईत जिल्हा भवनची केलेली मागणी लक्षवेधी ठरली. 

याबरोबरच शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि महिलांनीही आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अनेक समस्यांची माहिती जाणून घेत असतानाच त्या सोडविण्यासाठी सरकार कसे प्रयत्नशील आहे याची माहिती दिली.