होमपेज › Kolhapur › चोथेनेच घातला डोक्यात रॉड

चोथेनेच घातला डोक्यात रॉड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

गेल्या 20 दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या गुरव खून प्रकरणाचा मंगळवारी उलगडा झाला असून, याप्रकरणी गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश चोथे याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी विजय गुरव यांचा खून घरामध्येच बेडरूममध्ये केल्याचे कबूल केले.

खुनानंतर मृतदेह गुरव यांच्या गाडीमध्ये घालून आंबोली येथे टाकल्याचे सांगितले. बेडरूममध्ये जयलक्ष्मी व सुरेश चोथे दोघेजण होते. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गुरव यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यानंतर मृत झाल्याची खात्री करून मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीच बाहेर काढला. याशिवाय मृतदेहाच्या चेहर्‍यावर रॉडचे आणखी वारही केले असून, त्यामुळे चेहरा विद्रुप झाला आहे. पोलिसांना मृतदेहाच्या ठिकाणी लोखंडी रॉड सापडला असून, बेडरूममध्येही रक्‍ताचे डाग सापडले आहेत.  

गुरव यांचा खून केल्यानंतर दुसर्‍या दिवशी संशयित आरोपी सुरेश चोथे याने रक्‍ताने माखलेले कपडे महागाव (ता. गडहिंग्लज) येथील गावाबाहेर असलेल्या झुडपात पेटवून दिले होते. आज तपासामध्ये त्याने ही बाब सांगितल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावर जाऊन राखेचे नमुने घेतले. आज गुरव यांच्या घरी संशयितांना तपासासाठी आणल्यानंतर येथील वातावरण प्रचंड गरम झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तात संशयित आरोपींना घराच्या दारात आणल्यानंतर गुरव यांच्या नातेवाइकांनी शिव्यांची लाखोली वाहिली.

सुरेश चोथे याला उद्देशूनही घरच्यांनी प्रचंड शिव्या देण्यास सुरू केल्यानंतर पोलिसांनाही काही वेळ काय करावे ते समजेना झाले. घरच्यांची समजूत घालेपर्यंत पोलिसांनी दोन्ही आरोपींना गाडीतून उतरले नाही. यामधूनही नातेवाईकांनी जयलक्ष्मी हिच्या दिशेने चप्पल भिरकावले तर पोलिस गाडीत बसलेल्या सुरेश चोथे याला मारहाणीचा प्रयत्न झाला. सुमारे दोन तास या ठिकाणी पोलिसांनी तपासासाठी आरोपींना थांबवले होते. तोपर्यंत घरच्यांनी या दोघांना व विशेषत: जयलक्ष्मी हिला अक्षरश: शिव्यांनी न्हाऊन घातले होते.

सकाळी साडेआकराच्या सुमारास सावंतवाडी पोलिसांची टीम गडहिंग्लज पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही आरोपींना घेऊन आली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस व पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी घटनास्थळाला जाण्यापुर्वी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. घरातील मुले वगळता अन्य नातेवाईक प्रक्षोभक असल्याने या ठिकाणी आरोपींच्यावर हल्ला अथवा मारहाण होण्याची शक्यता असल्याने हा खटाटोप करण्यात आला. पोलिस वाहने घराजवळ जाताच घरातील महिलांनी आरोपींना शिव्या देण्यास प्रारंभ केला. या ठिकाणी बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलिस उपनिरीक्षक कुरणे यांनी या ठिकाणी जमलेल्या बघ्यांची गर्दी कमी केली व घराचे गेट लावून आतमध्ये तपास सुरू केला.

यावेळी प्रथम सुरेश चोथे याला घरामध्ये तपासासाठी नेण्यात आले. या ठिकाणी फॉरेन्सीक टीम व सावंतवाडी पोलिसांनी तपासासाठी आवश्यक असलेल्या सर्व ठिकाणांची आरोपी चोथेसमवेत पाहणी केली. यानंतर जयलक्ष्मी हिला घरामध्ये नेण्यासाठी गाडीतून उतरले असता पुन्हा नातेवाईकांनी तिला जोरदार शिव्या देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अखेर तुम्ही तपासासाठी सहकार्य केले तरच आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविता येईल असे सांगताच ते पुन्हा शांत झाले. जयलक्ष्मी हिलाही सर्व घरामध्ये फिरवून घटनेची उजळणी केली.

यानंतर घरातल्यांचा विरोध पाहून पोलिसांनी दोन्ही आरोपींना गडहिंग्लज पोलिस ठाण्यात आणले तर सावंतवाडी पोलिसांनी घरातल्यांचे जबाब नोंदवून घेण्यास प्रारंभ केला. सायंकाळी पुन्हा या दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेऊन पुन्हा त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत तपासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ताब्यात घेतल्या.

रॉड घातल्यानंतर कुणालाच जाग नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय गुरव हा मद्यधुंद अवस्थेत असताना बेडरुममध्ये झोपलेल्या स्थितीमध्ये सुरेश याने डोक्यामध्ये लोखंडी रॉड घातला. एवढ्या दणक्यात रॉड घातल्यानंतर गुरव हा नक्‍कीच ओरडला असेल मात्र त्याच्या ओरडण्याचा आवाज घरातील इतर कुणालाही आला नाही हेही विशेष आहे. याशिवाय त्याचा मृतदेह त्याचवेळी हलविण्यात आला असून त्याची भनकही कोणाला लागली नाही. त्यामुळे यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का ? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

गुरव यांच्या बहिणींचा संताप

आज जयलक्ष्मी व सुरेश याला घटनास्थळावर म्हणजे घरी आणल्यानंतर विजय गुरव यांच्या बहिणींनी जयलक्ष्मी हिच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्‍त करत तिला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली. पोलिसांनीही त्यांनी आम्ही तीला मारत नाही खरं तिला शिव्या तरी देऊ द्या असे स्पष्ट केले. आणखी एका नातेवाईकाने तर आम्हाला मारून टाका मात्र यांना सोडणार नाही अशी धमकीच दिली. त्यामुळे पोलिसांना आज फार शांततेने तपास करावा लागला.