होमपेज › Kolhapur › पानसरे हत्या प्रकरण : पुरावा मिळताच वाघमारेचा ताबा घेणार

पानसरे हत्या प्रकरण : ..तर वाघमारेचा ताबा घेणार

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 9:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटी कर्नाटकातील विशेष पथकाच्या संपर्कात आहे. लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या केल्याचा एक जरी पुराव्याचा धागा हाताला लागल्यास परशुराम वाघमारेसह साथीदारांचा ताबा घेण्यात येईल, असे अप्पर पोलिस महासंचालक तथा एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रानेच कॉ. पानसरे व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात फॉरेन्सिक लॅबचा एसआयटीकडे अहवाल उपलब्ध झालेला नाही. संबंधित अहवालाच्या अनुषंगाने एसआयटीचे वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक लवकरच बंगळूरकडे रवाना होत आहे, असेही ते म्हणाले.

लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेसह साथीदारांनी केल्याचा निष्कर्ष कर्नाटकातील विशेष पथकाने काढला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. पुरोगामी चळवळीतील तिन्ही नेत्यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाल्याचे कर्नाटकातील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात उघड झाल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आल्याने त्यावर कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात पडसाद उमटू लागले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर संजयकुमार म्हणाले, कर्नाटक विशेष पथकातील प्रमुख अधिकार्‍यांबरोबर आपला सतत संपर्क होत आहे. एसआयटी पथकातील अधिकार्‍यांनी बंगळूर येथील अधिकार्‍यांशी यापूर्वीही संपर्क साधलेला आहे. 

वाघमारेसह त्याच्या साथीदारांचे पाच वर्षांतील सीडीआर, त्यांच्याशी असलेली जवळीक, वास्तव्याचे ठिकाण, त्यांचा वावर याचीही प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे.

वाघमारेसह साथीदारांचेकोल्हापूर कनेक्शन

परशुराम वाघमारेसह साथीदारांचा यापूर्वी कोल्हापूरशी संपर्क आला होता का? स्थानिक पातळीवरील कोणाबरोबर संपर्क आला होता? याचीही माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही अप्पर पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले.

वाघमारेसह साथीदारांचा ताबा घ्यावा : पानसरे कुटुंबीय

कॉ. पानसरे हत्येच्या अनुषंगानेही महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता असल्याने एसआयटीने परशुराम वाघमारेसह साथीदारांचा ताबा घ्यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी शनिवारी केली. कॉ. पानसरे यांच्या स्नुषा प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या की, लंकेश यांच्या हत्येची कबुली देणारा संशयित मारेकरी कर्नाटक एसआयटीच्या हाताला लागला आहे.

पुरोगामी चळवळीतील नेत्यांच्या हत्येचे गूढ आणि त्यामागे दडलेल्या मास्टरमाईंडचा चेहरा उघड्यावर येईल. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पुरोगामी चळवळीतील हत्येप्रकरणी तपास यंत्रणांच्या हाती प्रथमच ठोस माहिती लागत आहे. चौकशीतून कॉ.पानसरे यांच्याही हत्येचा उलगडा होऊ शकेल, अशी अपेक्षा मेघा पानसरे यांनी व्यक्‍त केली.

तपास पथकातील स्थानिक अधिकार्‍यांचे मौन

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीच्या स्थानिक तपास यंत्रणेतील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, कर्नाटक एसआयटीच्या तपासात निष्पन्‍न माहितीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या नियंत्रणाखाली सहायक तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे तपास पथकात कार्यरत आहेत. त्यांनीही मौन पाळले आहे.