Tue, Apr 23, 2019 18:13होमपेज › Kolhapur › रेशन दुकानांत गॅस सिलिंडर!

रेशन दुकानांत गॅस सिलिंडर!

Published On: Dec 03 2017 1:33AM | Last Updated: Dec 02 2017 11:55PM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी केरोसिनचा होणारा वापर कमी करण्याकरिता, तसेच गॅस सिलिंडर अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण हेात असल्यामुळे पाच किलो वजनाचे गॅस सिलिंडर विक्रीसाठी आता स्वस्त धान्य दुकानांतून, तसेच केरोसिन विक्रेते यांच्याकडे ठेवण्यात येणार  असल्यामुळे लवकरच रेशन दुकानांमध्ये धान्याबरोबरच गॅस सिलिंडरही दिसून येणार आहेत.

राज्यात किरकोळ वापराकरिता केरोसिनची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र, अनुदानित केरोसिन उपलब्ध करून देणे शासनाला शक्य नसल्यामुळे गरजू व्यक्ती आणि संस्था यांना किरकोळ वापराकरिता लहान सिलिंडर प्राप्त करून देता यावे व अनुदानित दराच्या केरोसिनवरील ताण कमी व्हावा, या कारणास्तव खुल्या बाजारात 5 किलो वजनाचे लहान सिलिंडर वितरित करण्यात येणार आहेत.

स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन विके्रते यांना 5 किलोची 20 सिलिंडरपेक्षा जास्त सिलिंडरची साठवणूक करता येणार नाही. धान्य दुकानदार यांनी अधिकृत एजंट यांच्याकडून पाच किलोची सिलिंडर उपलब्ध करून घेऊन त्यांची विक्री करावयाची आहे. त्यासाठी त्याचे कमिशन किती, हा विषय आता कळीचा ठरणार असून याबाबतचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन विके्रते, गॅस वितरक आणि अधिकारी यांच्या बैठकीतून ठरण्याची शक्यता आहे.

स्वस्त धान्य दुकानांतून गॅस सिलिंडर विक्रीसाठी ठेवण्यासाठी सध्या अधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेेत. ही पाच किलोची सिलिंडर कोणालाही विकत घेता येणार आहेत. त्यासाठी रेशनकार्डची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात येत आहे. सिलिंडर, रेग्युलेटर, सिलिंडरची नळी असे किट सोबत असणार आहे. एकावेळी एका दुकानदाराला वीस सिलिंडर ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज भासणार नाही. अंदाजे 370 रुपयांना हे सिलिंडर उपलब्ध होणार आहे. 

गॅसपुरवठा करणार्‍या एजन्सी अनेक होऊनदेखील ग्रामीण भागात अद्याप गॅस सिलिंडर सक्षमपणे पुरवठा होत नाहीत, वेळेवर येत नाहीत, आलेले कळत नाही, निश्‍चित वेळ पाळली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना गॅस सिलिंडरच्या गाडीच्या आवाजाकडे कान लावून बसण्याची वेळ येत आहे. सकाळी सकाळीच दारात सिलिंडरची टाकी ठेवून दिवसभर गाडीची वाट पाहत बसणार्‍या गृहिणींचे इतर कामांकडे दुर्लक्ष होत असते.

अनेकदा पैशांची उपलब्धता नसल्याने गाडी आली तरी सिलिंडर घेता येत नाही. पैशांची जमवाजमव करून आपल्या सोयीनुसार आणि सवडीप्रमाणे सिलिंडर आणण्याकरिता नंतर शहरातील एजन्सीकडे जावे लागते. त्यावेळी तारांबळ होते, खर्चही होतो, तसेच वेळेवर मिळेलच याची खात्री नसते. आता मात्र गावातील रेशन दुकानांतच सिलिंडर उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या उपलब्ध असणारे सबसिडीचे 14 किलोचे सिलिंडर आणि पाच किलोचे सिलिंडरचा दर या दराचीदेखील तुलना होऊन ग्रामीण आणि शहरी भागात या सिलिंडरना कसा प्रतिसाद मिळतो, याची प्रतीक्षा आहे.