Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : कार्बन डायऑक्साईड गॅसचा स्फोट; कामगार ठार

कोल्‍हापूर : कार्बन डायऑक्साईड गॅसचा स्फोट; कामगार ठार

Published On: Jun 17 2018 7:58PM | Last Updated: Jun 17 2018 8:00PMशिये ः वार्ताहर

शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परप्रांतीय कामगार ठार झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिपीनकुमार आर्या (वय 30, रा. मथुरा, उत्तर प्रदेश, सध्या रा. शिरोली एमआयडीसी) असे स्फोटात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर अमित कृष्णात वंजारे (30, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) व वसंत विष्णू परीट (42, रा. सौदापूर, ता. शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत. परीट यांच्यावर सीपीआर रुग्णालयात, तर वंजारे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये के. इंडस्ट्रीज गॅस प्रा. लि. या कंपनीमध्ये औद्योगिक कारखाने, दवाखाने यासाठी लागणारे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करून विविध ठिकाणी प्रक्रिया करून सिलिंडरमधून पाठवले जातात. याकरिता सातारा येथून प्रक्रियेसाठी लागणारे कार्बन डायऑक्साईड सिलिंडर्स आणले जातात. रविवारी सकाळी सातारा येथून आणलेले सिलिंडर गाडीतून उतरविले जात असताना 9 किलो गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात बिपीनकुमार आर्या हा कामगार गंभीर जखमी  झाला. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. तर अमित कृष्णात वंजारे व वसंत विष्णू परीट जखमी झाले. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

स्फोटाची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक आर. आर. पाटील,  शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्यासह दहशतविरोधी पथकाने तातडीने धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.